Narendra Modi Mumbai Metro 3 Line : मेट्रो 3 चा आरे ते बीकेसी पहिला टप्पा आज सुरु होणार
आरे ते बीकेसी भूमिगत मेट्रोचं लोकार्पण
आज सायंकाळी 6 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी बीकेसी ते आरे जेव्हीएलआर धावणाऱ्या मेट्रो ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील, त्यानंतर बीकेसी ते सांताक्रूझ मेट्रो प्रवास देखील करणार असल्याची माहिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो 3 च्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करण्यात येणार आहे. कुलाबा ते सीप्झ यापैकी पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झालं आहे. आरे ते बीकेसी या लाईन वरील सेवा नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर सुरु होणार आहे. पहिल्या टप्प्यातील 10 स्थानकांपैकी 9 स्थानकं भूमिगत असणार आहेत.
केंद्र सरकारनं मराठी भाषेसह एकूण 5 भाषांना अभिजात भाषेचा दर्जा दिला होता. महाराष्ट्र सरकारची कित्येक वर्षांची मागणी यानिमित्तानं पूर्ण झाली होती. त्यानिमित्तानं बीकेसीमध्ये महाराष्ट्र सरकारच्या वतीनं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. अभिजात मराठी सन्मान सोहळा बीकेसीमध्ये पार पडणार आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याबद्दल सन्मान आणि कृतज्ञता सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नामांकित साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. आज सायंकाळी हा सोहळा पार पडणार आहे.