Devendra Fadnavis on Manoj Jarange : आरक्षण हा मजा घेण्याचा विषय नाही
Devendra Fadnavis On Manoj Jarange नागपूर: काही लोक बोलतात आता पहिलं सरकार आहे देतील का?, पण आता खरी मजा आहे. हिशोब चुकता करण्याची... होऊ द्या आता...पहिले हा दुसऱ्यांवर ढकलत होता ना, मी विरोध करत नाही, मी द्या म्हणतो. आता कळेल देतो की नाही ते, असं विधान करत मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर टीका केली. मनोज जरांगेंच्या या विधानावर आता देवेंद्र फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे.
यात मजा घेण्याचा प्रश्न नाही- देवेंद्र फडणवीस
देवेंद्र फडणवीसांना मनोज जरांगेंनी केलेल्या आता खरी मजा आहे, हिशोब चुकता करण्याच्या विधानावर प्रतिक्रिया विचारली. यावर यात मजा घेण्याचा प्रश्न नाही. हा जनतेच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. आम्ही या प्रश्नावर पहिल्या दिवसापासून गंभीर आहोत. या विषयावर माझ्या, अजित पवार आणि एकनाथ शिंदे तिघांच्या भूमिकेत कुठलाही अंतर नाहीय. आजवर आम्ही जे निर्णय घेतले, ते मिळून घेतले आहेत. पुढेही या संदर्भात तिघे मिळून निर्णय घेऊ, असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. देवेंद्र फडणवीसांनी आज नागपूरातील प्रेस क्लबमध्ये माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.
परभणी आणि बीडमधील घटनेवर काय म्हणाले?
परभणीमध्ये घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे. एखाद्या घटनेच्या महत्त्व ( गांभीर्य ) तिथे कोण गेला आहे, त्यापेक्षा आपण त्याला कसं रिस्पॉन्स करतो यावरून ठरतं. प्रत्येकच ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी जावे असं होत नाही. घटना महत्त्वाची होती म्हणूनच उपमुख्यमंत्री अजित पवार त्या ठिकाणी केले होते. घटनास्थळी पर्यटन करू नये, असं आवाहन देवेंद्र फडणवीसांनी केलं. तसेच
बीडमध्ये आम्ही कोणाचीही दादागिरी चालू देणार नाही, असंही देवेंद्र फडणवीसांनी यावेळी सांगितले.