Zero Hour : आक्रमक भुजबळ पुढं काय करणार? राहणार की राष्ट्रवादीतून बाहेर पडणार?
Zero Hour : आक्रमक भुजबळ पुढं काय करणार? राहणार की राष्ट्रवादीतून बाहेर पडणार?
राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झालीय, हे तुम्ही सर्व जाणता. वास्तविक अधिवेशन म्हटलं की विरोधकांची प्रश्न, टीका आणि आरोप हे सारं होतं. त्यावर सरकारकडून उत्तरं देण्यात येतात आणि बचाव करण्यात येतो. पण आजचा दिवस ना विरोधकांनी गाजवला, ना सरकारनं. तो गाजला सत्ताधारी महायुतीतल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवारांमुळे... प्रचंड बहुमतानं निवडून आलेल्या महायुती सरकारमध्ये भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यात आलं, त्यावर त्यांनी अगदी उघड नाराजी व्यक्त केली. होय, मी नाराज आहे. मंत्रिपदं आली आणि गेली पण भुजबळ संपला नाही या शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. आणि त्याच वेळी भुजबळांनी आणखी एक सूचक वक्तव्य केलं. मंत्रिपद नाकारल्याबद्दल मी अजित पवारांशी चर्चा केली नाही, मला त्याची गरज वाटली नाही असंही ते म्हणाले. हे नाट्य इथंच संपलं नाही मंडळी. पत्रकारांशी बोलल्यावर भुजबळ तडकाफडकी नाशिकला रवाना झाले. मला समता परिषदेच्या सदस्यांशी चर्चा करायची आहे, असं म्हणत अधिवेशन सोडून भुजबळ नाशिककडे निघाले. तिथं ते उद्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना भेटणार आहेत, तर बुधवारी ते समर्थकांचा मेळावा घेण्याची शक्यता आहे. भुजबळांना मंत्रिपद नाकारण्यामागे अनेक कारणं असू शकतात. पहिलं संभाव्य कारण मराठा आरक्षणाशी निगडित आहे. तर दुसरं संभाव्य कारण म्हणजे अजित पवार आणि भुजबळांमधील मतभेदांची शक्यता किंवा राष्ट्रवादी काँग्रेसनं वरिष्ठ नेत्यांना एक प्रकारे निवृत्ती देण्याचं ठरवलं असण्याची शक्यता आहे. मंडळी, इतकंच नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसप्रमाणं भाजपमध्येही नाराजी आहे. कारण राज्याचे माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनाही नव्या मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाही. एबीपी माझाला त्यांनी exclusive प्रतिक्रिया दिली. त्यात ते भुजबळांप्रमाणं, मी नाराज आहे, असं उघडपणे म्हणाले नाहीत, पण अप्रत्यक्षपणे त्यांनी तसे संकेत दिले. सुधीर मुनगंटीवारांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन, त्यांच्याशी तब्बल दीड तास चर्चा केली.