Mohit Sharma in IPL : वयाच्या 34 व्या वर्षी दमदार पुनरागमन, आयपीएलमध्ये मोहित शर्माच्या विकेटचं शतक पूर्ण
IPL 2023 DC vs GT, Mohit Sharma : मोहित शर्माने रिपल पटेलला बाद करत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 विकेट्स घेतले आहेत.
Mohit Sharma 100 Wickets in IPL : इंडियन प्रीमियर लीगमधील तब्बल तीन वर्षानंतर दमदार पुनरामन करत मोहित शर्मानं शंभर नंबरी कामगिरी केली आहे. मोहित शर्माने त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 विकेट घेतल्या आहेत. 02 मे रोजी पार पडलेल्या गुजरात विरुद्ध दिल्ली (GT vs DC) सामन्यात त्याने हा विक्रम स्वत:च्या नावे केला.
आयपीएलमध्ये मोहित शर्माच्या विकेटचं शतक पूर्ण
आयपीएल 2023 च्या 44 व्या सामन्यात गुजरात टायटन्सचा वेगवान गोलंदाज मोहित शर्माने दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या सामन्यात एक विक्रम नोंदवला आहे. मोहित शर्माने रिपल पटेलला बाद करत त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील 100 बळी पूर्ण केले आहेत.
मोहित शर्माची अप्रतिम गोलंदाजी
दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध मोहित शर्माने अप्रतिम गोलंदाजी केली. उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाज असणाऱ्या मोहितने चार षटकांत 33 धावा देत दोन बळी घेतले. त्याने पहिल्यांदा अक्षर पटेलला लाँग ऑफवर राशिद खानकरवी झेलबाद केलं. यानंतर मोहित शर्माने रिपल पटेलला कर्णधार हार्दिक पांड्याकडून झेलबाद करून आयपीएलमधील 100 वा गडी बाद केला.
तब्बल तीन वर्षानंतर दमदार पुनरामन
मोहित शर्माने तब्ब्ल तीन वर्षानंतर आयपीएलमध्ये पदार्पण केलं आहे. याआधी मोहित आयपीएल 2020 मध्ये दिल्ली कॅपिटल्स संघासाठी शेवटचा आयपीएल सामना खेळला होता. त्यानंतर यंदाच्या मोसमात त्यानं तब्बल तीन वर्षानंतर मोहितनं आयपीएलमध्ये दमदार पदार्पण केलं आहे.
100 विकेट घेणारा 23वा गोलंदाज
आयपीएलमध्ये विकेट्सचं शतक पूर्ण करणारा मोहित शर्मा हा 23 वा गोलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंतच्या 92 सामन्यांत 25.95 च्या सरासरीने आणि 8.36 च्या इकॉनॉमी रेटने 100 गडी बाद केले आहेत. 14 धावांत 4 गडी बाद करणे ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. सध्याच्या आयपीएल (IPL 2023) हंगामात मोहितच्या दमदार गोलंदाजीने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. आयपीएल 2023 मध्ये, त्याने आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांमध्ये 15.63 च्या सरासरीने आणि 6.94 च्या इकॉनॉमी रेटने 8 विकेट घेतल्या आहेत.
'या' कारणामुळे तीन वर्ष आयपीएलपासून दूर
आयपीएल 2022 मध्ये मोहित गुजरात संघाचा नेट गोलंदाज होता आणि यंदा हार्दिक पांड्याच्या नेतृत्वात त्याला आयपीएल 2023 मध्ये पदार्पणाची संधी मिळाली. 34 वर्षीय मोहित खराब फॉर्म आणि नंतर दुखापतीमुळे भारतीय संघातून बाहेर आहे. पण कर्णधार हार्दिक पांड्याने पंजाब विरुद्धच्या सामन्यात मोहितला गुजरातकडून गोलंदाजी करण्याची संधी दिली आणि मोहितनं या संधीचा पुरेपुर फायदा घेत चमकदार कामगिरी केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :