IPL 2021: मायदेशी परतल्यास ऑस्ट्रेलियातील खेळाडूंना होऊ शकतो तुरुंगवास, भरावा लागणार मोठा दंड
सिडनी मॉर्निंग हेराल्डच्या वृत्तानुसार ऑस्ट्रेलियातील शासनाने भारतातून देशात येणाऱ्या व्यक्तीला दंड ठोठावण्यासोबत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
IPL 2021: भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर पाहता, ऑस्ट्रेलियाकडून भारतातून येणाऱ्या सर्व उड्डाणांवर बंदी आणली आहे. यामुळं भारतात आयपीएल स्पर्धेसाठी असणाऱ्या आणि मायदेशी परतू पाहणाऱ्या ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंपुढं एक मोठी अडचण उभी राहिली आहे. यातच आणखी एक चिंतेची बाब समोर येत आहे, जिथं मायदेशी परतल्यास या खेळाडूंवर कारवाई होण्याचीही चिन्हं आहेत.
ऑस्ट्रेलियातील माध्यमांच्या वृत्तानुसार या खेळाडूंना कोणा एका वेगळ्या ठिकाणी ठेवण्यात येऊ शकतं. त्यांना मोठा दंडही ठोठावला जाऊ शकतो. याशिवाय खेळाडूंना तुरुंगवासही होऊ शकतो. सिडनी मॉर्निंग हेराल्डमधील वृत्तानुसार ऑस्ट्रेलियातील शासनाने भारतातून देशात येणाऱ्या व्यक्तीला दंड ठोठावण्यासोबत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे.
सध्याच्या घडीला भारतात सुरु असणाऱ्या आयपीएल 2021 मध्ये ऑस्ट्रेलियातील खेळाडूंचाही समावेश आहे. यामध्ये डेविड वॉर्नर, स्टीव स्मिथ, ग्लेन मॅक्सवेल आणि पॅट कमिंस या खेळाडूंचा समावेश आहे. याव्यतिरिक्त फ्रँचायजी कोचिंग, सपोर्ट स्टाफ आणि समालोचनामध्येही रिकी पाँटिंग, डेविड हसी, ब्रेट ली, मॅथ्यू हेडन यांचाही समावेश आहे.
Breaking News LIVE : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे अपडेट्स एका क्लिकवर
दरम्यान, ऑस्ट्रेलियातील माध्यमांमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार, सद्यस्थितीमध्ये भारतातून ऑस्ट्रेलियात येणाऱ्यांवर गुन्ह्याची नोंद करत त्यांना 66,000 डॉलरचा दंड ठोठावला जाणार आहे. सध्याच्या घडीला 36,000 ऑस्ट्रेलियन नागरिक परदेशात अडकल्याचं वृत्त आहे. यापैकी 9 हजार नागरिक एकट्या भारतात आहेत. यामध्ये आयपीएलचा भाग असणाऱ्यांचाही समावेश आहे. आयपीएल स्पर्धेसाठी खेळाडू वैयक्तिक जबाबदारीनं भारतात गेले आहेत म्हणून त्यांनी परतण्याची व्यवस्थाही स्वत:हूनच करावी, असं ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी स्पष्ट केलं.