Team India Coach: जॉन्टी रोड्स टीम इंडियाचे फिल्डिंग कोच होणार?; गौतम गंभीरसोबत सांभाळू शकतात जबाबदारी!
Team India Coach Jonty Rhodes: दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स यांनी भारतीय संघाचे फिल्डिंग कोच होण्यासाठी अर्ज केला आहे.
Team India Coach Jonty Rhodes: कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटर (KKR) आणि माजी भारतीय फलंदाज गौतम गंभीर (Gautam Gambhir) लवकरच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक (Indian Cricket Team Head Coach) बनणार आहेत. याबाबत महिन्याच्या शेवटी बीसीसीआयकडून मोठी घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. सध्या टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड आहे. सधा सुरु असलेल्या 2024 च्या टी 20 विश्वचषकानंतर राहुल द्रविडचा कार्यकाळ संपणार आहे. त्यानंतर भारतीय संघाची जबाबदारी गौतम गंभीरकडे देण्यात येणार आहे.
बीसीसीआय आणि गौतम गंभीर यांच्यात एक करार झाला असल्याची माहिती समोर येत आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली, संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये फलंदाजी प्रशिक्षक म्हणून विक्रम राठौर, गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस महांबरे आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक म्हणून टी. दिलीप यांचा समावेश होता. आता गौतम गंभीर प्रशिक्षण झाल्यानंतर या सगळ्यांना देखील हटवले जाऊ शकते. त्यामुळे गंभीर स्वतः सपोर्ट स्टाफची निवड करणार असल्याचं सांगितलं जात आहे.
जॉन्टी रोड्स यांचा फिल्डिंग कोचसाठी अर्ज-
दक्षिण आफ्रिकेचे माजी खेळाडू आणि महान क्षेत्ररक्षक जॉन्टी रोड्स यांनी भारतीय संघाचे फिल्डिंग कोच होण्यासाठी अर्ज केला आहे. त्यांनी 2019 लादेखील फिल्डिंग कोचसाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळेचे भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आर. श्रीधर यांना पहिली पसंती दिली होती. सध्याचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी टी. दिलीप यांची फिल्डिंग कोच म्हणून निवड केली होती. जॉन्टी रोड्स सध्या लखनौ सुपर जायंट्सचे फिल्डिंग कोच आहेत.
नवीन प्रशिक्षकाचा कार्यकाळ किती?
टीम इंडियाच्या नवीन मुख्य प्रशिक्षकाचा कार्यकाळ 1 जुलै 2024 पासून सुरू होईल, जो 31 डिसेंबर 2027 पर्यंत चालेल. नवीन मुख्य प्रशिक्षकाच्या कार्यकाळात, टीम इंडिया एकूण 5 ICC ट्रॉफी खेळणार आहे, ज्यात चॅम्पियन्स ट्रॉफी, T20 विश्वचषक, एकदिवसीय विश्वचषक आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या 2 चषकांचा समावेश आहे.
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय कारकीर्द -
गौतम गंभीरचं आंतरराष्ट्रीय करियर शानदार राहिलेय. त्यानं टीम इंडियासाठी 147 वनडे सामने खेळले आहेत, त्यामध्ये 5238 धावा केल्या आहेत. वनडेमध्ये गौतम गंभीरने 11 शतके आणि 34 अर्धशतके ठोकली आहेत. गौतम गंभीर टीम इंडियासाठी 58 कसोटी सामने खेळलाय, यामध्ये 4154 धावा केल्या आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने 9 शतके आणि 22 अर्धशतके ठोकली आहेत. कसोटीमध्ये गौतम गंभीरने द्विशतकही ठोकलेय. गौतम गंभीर याने 37 टी 20 सामनेही खेळले आहेत. यामद्ये 932 धावा केल्या आहेत. त्याने यादरम्यान सात अर्धशतके ठोकली आहेत. 2007 टी20 वर्ल्डकप आणि 2011 वनडे वर्ल्डकप विजयात गौतम गंभीरचाही मोठा वाटा राहिला आहे.