Nz vs Eng 2nd Test : पहिल्या दिवशी 15 विकेट! हॅरी ब्रूक अन् पोपने न्यूझीलंडच्या WTC फायनलच्या आशांना दिला धक्का
सध्या इंग्लंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे.

New Zealand vs England 2nd Test WTC 2025 : सध्या इंग्लंड संघ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतर्गत न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे. जेथे तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा कसोटी सामना वेलिंग्टन येथील बेसिन रिझर्व्ह मैदानावर खेळला जात आहे. सामन्याचा पहिला दिवस पूर्णपणे इंग्लंडच्या नावावर होता.
नाणेफेक हरल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या इंग्लंडने 280 धावा केल्या आणि प्रत्युत्तरात यजमान न्यूझीलंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत केवळ 86 धावांत पाच विकेट गमावल्या. न्यूझीलंडचा संघ अजूनही इंग्लंडच्या 194 धावांनी पिछाडीवर असून फक्त पाच विकेट्स हातात आहेत.
सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 15 विकेट पडल्या, पण गोलंदाजांच्या दमदार कामगिरीमध्ये हॅरी ब्रूक आणि ऑली पोप यांच्या फलंदाजीनेही चाहत्यांचे खूप मनोरंजन केले. एकवेळ इंग्लंडने 43 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. यानंतर हॅरी ब्रूक आणि पोप यांनी मिळून धावसंख्या 200 च्या पुढे नेली. हॅरी ब्रूकने 115 चेंडूत 123 धावांची शानदार खेळी केली, तर पोप 66 धावा करून बाद झाला. न्यूझीलंडकडून नॅथन स्मिथने चार, तर विल्यम ओ'रुर्कने तीन बळी घेतले. दोन विकेट मॅट हेन्रीच्या खात्यात गेल्या.
Two late Brydon Carse strikes put England ahead in Wellington 👏#NZvENG 📝 https://t.co/O9PbLOLpGd#WTC25 pic.twitter.com/FRDjVCP08v
— ICC (@ICC) December 6, 2024
प्रत्युत्तरात न्यूझीलंडने दिवसाचा खेळ संपेपर्यंत 26 षटकांत 86 धावांत पाच गडी गमावले होते. इंग्लंकडून ब्रायडन कारसेने दोन, तर ख्रिस वोक्स, गुस ऍटकिन्सन आणि कर्णधार बेन स्टोक्सने प्रत्येकी एक विकेट घेतली. सलामीवीर डेव्हॉन कॉनवे 11 धावा करून बाद झाला तर कर्णधार टॉम लॅथम 17 धावा आणि रचिन रवींद्र केवळ तीन धावा करून बाद झाला. माजी कर्णधार केन विल्यमसन खेळपट्टीवर चांगलाच दिसत होता, पण ब्रायडन कार्सने त्याला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. यानंतर डॅरेल मिशेल सहा धावा करून बाद झाला. विल्यम ओ'रूर्क खाते न उघडता राहिला, तर टॉम ब्लंडेल सात धावा करून नाबाद परतला.
न्यूझीलंड संघाच्या WTC फायनलच्या आशा मावळल्या?
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीच्या शर्यतीतून इंग्लंड आधीच बाहेर आहे, दुसरीकडे, किवी संघ अजून शर्यतीत आहे, पण त्यांच्यासाठी हा मार्ग थोडा कठीण आहे. पहिल्या कसोटीत हरल्यानंतर न्यूझीलंड WTC गुणतालिकेत चौथ्या वरून पाचव्या स्थानावर घसरला आहे. न्यूझीलंडची गुणांची टक्केवारी आता 47.92 वर आली आहे आणि पुढील सर्व सामने जिंकून त्याची टक्केवारी कमाल 55.36 पर्यंत जाऊ शकते. इंग्लंडविरुद्धचे उर्वरित दोन्ही सामने जिंकले तरी अंतिम फेरी गाठण्यासाठी त्याला इतरांवर अवलंबून राहावे लागेल. पण दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाची कामगिरी पाहता, वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या शर्यतीतून न्यूझीलंड बाहेर जाऊ शकते.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
