एक्स्प्लोर
मैदान कोणतंही असो, 25 मीटर्स रॅपिड पिस्टलमध्ये राहीचा नाद करायचा नाही!
राहीनं थायलंडच्या नाफास्वानवर शूटऑफमध्ये मात करून, 25 मीटर्स रॅपिड पिस्टलच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. याच कामगिरीच्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.

मुंबई: महाराष्ट्राच्या... आपल्या कोल्हापूरच्या राही सरनोबतनं नवा इतिहास घडवलाय. एशियाडच्या इतिहासात सुवर्णपदक जिंकणारी राही सरनोबत ही पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली.
राही सरनोबतनं जकार्ता-पालेमबान्ग एशियाडमध्ये 25 मीटर्स रॅपिड पिस्टलच्या सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. या सुवर्णपदकासाठी राही सरनोबत आणि थायलंडची नाफास्वान या दोघींमध्ये झालेला शूटऑफ हा त्यांच्या एकाग्रतेची, चिकाटीची आणि प्रचंड दडपणाखाली अचूक लक्ष्यवेधाची परीक्षा पाहणारा ठरला. त्या कठोर परिक्षेत राहीनं बाजी मारली.
म्हणूनच पालेमबान्गच्या रणांगणात भारतीय तिरंगा डौलानं फडकला.
27 वर्षांची राही सरनोबत ही मूळची महाराष्ट्रातल्या कोल्हापूरची आहे. त्यामुळं तिची कामगिरी महाराष्ट्रासाठी अधिक अभिमानास्पद ठरली आहे.
एशियाडच्या इतिहासात आजवर रणधीरसिंग, जसपाल राणा, रंजन सोधी, जीतू राय आणि यंदा सौरभ चौधरी या पाच पुरुष नेमबाजांनी भारताला सुवर्णपदक जिंकून दिलं आहे. त्या पंक्तीत दाखल होणारी राही सरनोबत ही सहावी भारतीय आणि पहिली भारतीय महिला ठरली.
राही सरनोबतनं नेमबाजीत दुनियेत सर्वोत्तम कामगिरी बजावण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. 2010 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत तिनं 25 मीटर्स रॅपिड पिस्टल दुहेरीचं सुवर्ण आणि एकेरीचं रौप्यपदक पटकावलं होतं. 2014 सालच्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतही ती 25 मीटर्स रॅपिड पिस्टलच्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली होती. 2014 सालच्या इन्चिऑन एशियाडमध्ये तिचा भारताच्या कांस्यविजेत्या चमूत सहभाग होता. पण त्याच्या आदल्या वर्षी म्हणजे 2013 साली राहीला कारकीर्दीतलं मोठं यश लाभलं. दक्षिण कोरियातल्या जागतिक नेमबाजीत तिनं 25 मीटर्स स्पोर्टस पिस्टलचं सुवर्णपदक जिंकलं.
राही सरनोबतच्या याच विश्वविजयाचा 'एबीपी माझा'नं 2013 साली तिला ‘माझा सन्मान’ पुरस्कार देऊन गौरव केला होता.
महाराष्ट्र शासनानंही 2013 साली एक कोटी रुपयांचं इनाम बहाल करून, मोठी भरारी घेण्यासाठी राहीच्या पंखात बळ भरलं. पण त्याच सुमारास राहीच्या पाठी दुर्दैवाचा फेरा लागला. एका छोट्या अपघातात तिचा खांदा दुखावला. तिला पाठदुखीनंही हैराण केलं. त्याच सुमारास तिचे प्रशिक्षक अनातोली यांचं निधन झालं. या प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करून, राहीनं एकलव्याच्या जिद्दीनं अथक सराव केला.
अखेर जर्मनीच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या आणि विश्वविजेत्या मुन्खबायर डॉरसरेनच्या रुपानं तिला नवी गुरू लाभली. एक चॅम्पियन नेमबाज असलेल्या डॉरसरेन यांनी राहीला संघर्षाच्या काळात नेमकं काय हवं आहे ते ओळखलं आणि तसं मार्गदर्शनही केलं.
राही सरनोबत आणि तिच्या नव्या गुरुंच्या प्रयत्नांमधून भारताला हवी असलेली चॅम्पियन नेमबाज नव्या जोमानं पुन्हा उभी राहिली. त्या चॅम्पियन नेमबाज राही सरनोबतनं भारताला एशियाडचं सुवर्णपदक तर जिंकून दिलं आहे. आता तिचं पुढचं लक्ष्य हे दक्षिण कोरियातल्या जागतिक नेमबाजीवर आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
भारत
भारत
भंडारा
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
