Asian Champions Trophy 2023 Semi-Final : भारतीय हॉकी संघाकडून जपानचा धुव्वा; 5-0 असा पराभव करत चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत धडक
Asian Champions Trophy Semi-Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताने जपानचा 5-0 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली.
Asian Champions Trophy 2023 Semi-Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी 2023 च्या उपांत्य फेरीत (Asian Champions Trophy) भारतीय हॉकी संघाने जपानचा 5-0 असा धुव्वा उडवत पराभव केला. आता अंतिम फेरीत भारताचा सामना मलेशियाशी होणार आहे. भारतीय संघाने उपांत्य फेरीत सुरुवातीपासूनच वर्चस्व राखले. सामन्याच्या पूर्वाधाच्या अखेरीस भारताने 3-0 अशी आघाडी घेतली होती. यानंतर उत्तरार्धात दोन गोल केले. अखेरीस टीम इंडियाने जपानविरुद्धचा (India Vs Japan) सामना 5-0 असा जिंकत दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला.
भारताने संपूर्ण आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीतही कामगिरीचे सातत्य दिसले. पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. यानंतर अर्शदीप सिंगने खाते उघडले. त्याने 19व्या मिनिटाला गोल केला. हरमनप्रीत सिंगने 23व्या मिनिटाला गोल केला. मनदीप सिंग, सुमित आणि कार्ती सेल्वम यांनीही प्रत्येकी एक गोल केला.
यापूर्वी दोन वर्षांपूर्वी ढाका येथे झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानने भारताचा 5-3 असा पराभव केला होता. पण यावेळी टीम इंडियाने दमदार खेळ करत आपल्या मागील पराभवाचे उट्टे काढले. या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया अतिशय आक्रमक खेळ करत होती. त्याचवेळी जपानचा संघ भारतीय संघाच्या आक्रमकतेविरोधात बचावात्मक खेळ करण्याचा प्रयत्न करत होती.
3 ऑगस्ट रोजी झालेल्या सामन्यात भारताने चीनचाही धुव्वा उडवला होता. या सामन्यात भारताने चीनवर 7-2 असा विजय मिळवला होता. यानंतर 4 ऑगस्टला जपानसोबतचा सामना 1-1 असा बरोबरीत सुटला. टीम इंडियाने 6 ऑगस्ट रोजी मलेशियावर शानदार विजय मिळवला. त्याने मलेशियाचा 5-0 असा पराभव केला. यानंतर कोरियाचा 3-2 असा पराभव केला. टीम इंडियाने पारंपरीक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचाही 4-0 असा धुव्वा उडवत उपांत्य फेरी गाठली होती. सेमीफायनलच्या शर्यतीत टिकून राहण्यासाठी पाकिस्तानला हा सामना जिंकणे किंवा ड्रॉ करणे आवश्यक होते. परंतु टीम इंडियाने एकतर्फी सामन्यात त्यांचा 4-0 असा पराभव केला. भारताने हा सामना जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थान पुन्हा पटकावले होते.
India have stormed their way to the Final of the Hero Asian Champions Trophy Chennai 2023 unbeaten ⚡#HockeyIndia #IndiaKaGame #HACT2023 @CMO_Odisha @CMOTamilnadu @asia_hockey @Media_SAI @sports_odisha pic.twitter.com/O7OVln5Im5
— Hockey India (@TheHockeyIndia) August 11, 2023
श्रीजेशचा 300 वा सामना
भारतीय गोलरक्षक पी श्रीजेशसाठी उपांत्य फेरीचा सामना खूप खास होता. त्याच्या कारकिर्दीतील हा 300 वा सामना होता. सामन्यापूर्वी त्याचा गौरवही करण्यात आला होता.