(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Dombivli : सहा वर्षाच्या मुलाचा लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मृत्यू, डोंबिवलीतील हृदयद्रावक घटना
विकासकाच्या हलगर्जीपणामुळे हा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात येत असू त्याच्याविरोधात कारवाई करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
डोंबिवली: लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात एका सहा वर्षाच्या मुलाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारच्या सुमारास घडली. वेदांत असं या चिमुकल्याचे नाव आहे. वेदांत सकाळी या इमारतीच्या परिसरात खेळत होता, खेळता खेळता बॉल खड्यात पडला. हा बॉल काढण्यासाठी वेदांत गेला आणि या खड्ड्यात पडल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
डोंबिवली पूर्व भागातील सांगर्ली परिसरात हनुमान जाधव हे आपल्या कुटुंबासह राहतात. त्यांना वेदांत नावाचा सहा वर्षाचा मुलगा होता. जाधव यांच्या इमारतीलगत एका इमारतीचे बांधकाम काम सुरु आहे. या इमारतीमध्ये लिफ्टचे बांधकाम करण्यासाठी एक खड्डा खोदण्यात आला होता. याच परिसरात सकाळी वेदांत खेळत होता.
दुपारचे बारा वाजले तरी वेदांत घरी न परतल्याने कुटुंबाने त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, वेदांतचा मृतदेह इमारतीसाठीच्या लिफ्टच्या खड्ड्यात तरंगताना दिसला. आजूबाजूच्या नागरिकांनी आणि वेदांतच्या काकांनी त्याला तातडीने खड्ड्यातून बाहेर काढले. मात्र तोपर्यत त्याचा मृत्यू झाला होता.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणी तपासाअंती संबधित विकासकाच्या विरोधात हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. मानपाडा पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
काही महिन्यापूर्वीच सागाव परिसरात असंच एक बांधकाम सुरु असलेल्या इमारतीमध्ये लिफ्टसाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून एका दहा वर्षीय मुलाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना घडल्याने विकासकांच्या हलगर्जीपणा बाबत कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- गद्दारांच्या डोळ्यात विकृत हास्य, शिवसैनिकांच्या डोळ्यातल्या अश्रूंची किंमत मोजावी लागणार; उद्धव ठाकरेंचा बंडखोरांना इशारा
- Chandrashekhar Guruji : चंद्रशेखर गुरुजींच्या दोन मारेकऱ्यांना अटक, हत्येमध्ये एका महिलेचा समावेश असल्याचं स्पष्ट
- सोन्याचा चमचा घेऊन काहीजण जन्म घेतात, नाव न घेता फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका