Bhiwandi News : भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक, भिवंडीतील आजी-माजी उपविभागीय अधिकारी निलंबित; विखे-पाटील यांची घोषणा
Bhiwandi News : जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीप्रकरणी भिवंडीचे तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आलं आहे. महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत ही घोषणा केली.
Bhiwandi News : जमिनीच्या मोबदल्यात शेतकऱ्यांच्या फसवणुकीप्रकरणी भिवंडीचे (Bhiwandi) तत्कालीन उपविभागीय अधिकारी आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी यांना निलंबित करण्यात आलं आहे. राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी काल (27 डिसेंबर) विधान परिषदेत (Vidhan Parishad) ही घोषणा केली. अनेक शासकीय प्रकल्पासाठी भूसंपादन करत असलेल्या जागांच्या व्यवहारांमध्ये आर्थिक अफरातफर झाल्याचा ठपका ठेवत तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नदळकर आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्या निलंबनाची घोषणा राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
जमीन संपादन करताना अनेक शेतकऱ्यांची फसवणूक
भिवंडी उपविभागीय अधिकारी कार्यालय कार्यक्षेत्रातून मुंबई-बडोदा महामार्ग, बुलेट ट्रेन, समृद्धी महामार्ग यांसह अनेक प्रकल्प जात आहे. या प्रकल्पांसाठी जमीन संपादन करताना अनेक शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचं समोर आलं आहे. बाधित शेतकऱ्यांना कोट्यवधींचा मोबदला देताना भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणं उजेडात आली आहेत. त्यामध्ये 11.5 कोटींचा भ्रष्टाचार, मोबदला परस्पर बोगस शेतकऱ्यांना देणं, मृत आदिवासी महिलेच्या जागी बोगस महिला उभी करुन 58 लाखांचा मोबदला लाटणे यासारख्या प्रकरणांचा समावेश आहे.
आजी-माजी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या निलंबनाची घोषणा
या प्रकरणी गुन्हे दाखल असतानाच अंजूर गाव इथले आदिवासी शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या बुलेट ट्रेनमध्ये बाधित जमिनीचा मोबदला देण्यास उपविभागीय अधिकारी बाळासाहे वाकचौरे हे टाळाटाळ करत होते. दरम्यानच्या काळात उंदऱ्या दोडे यांचे निधन झाल्याने उपविभागीय अधिकारी यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विधान परिषदेत आमदार प्रवीण दरेकर यांनी केली. त्यावरील चर्चेस उत्तर देताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तत्कालीन उपविभागीय अधिकारी डॉ. मोहन नळदकर आणि विद्यमान उपविभागीय अधिकारी बाळासाहेब वाकचौरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करत असल्याची घोषणा केली. या कारवाईनंतर महसूल विभागात एकच खळबळ माजली आहे. या प्रकणात आणखी काही जण अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे.
दोषींवर कारवाई करणार, विखे पाटील यांचं आश्वासन
दरम्यान प्रकल्पांसाठी केलेल्या भूसंपादनात शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. या सर्व तक्रारींची सोबतच अंजूर गाव इथले शेतकरी उंदऱ्या दोडे यांच्या मृत्यूची विभागीय आयुक्तामार्फत चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात येईल. तसंच भूसंपादनामध्ये ज्या शेतकऱ्यांना अद्याप मोबदला मिळालेला नाही त्यांना लाभ देण्यासाठी तात्काळ कार्यवाही केली जाईल, असं आश्वासन राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलं. तर दोडे यांच्या मृत्यू प्रकरणी त्यांच्या कुटुंबियांना आकस्मिक मदत करण्याचं तसंच त्यांच्या जमिनीचा मोबदला संबंधितांना मिळेल या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिले.