Sangli Renavi: अनादीकाळापासून सांगलीतील रेणावी गाव शाकाहारी, गावात आलेली सूनबाईदेखील बनते शाकाहारी, चकुल्या बनवून पाहुण्यांचे स्वागत
Pure Vegetarian Village Renavi: या गावातील रेवणसिद्ध दैवाच्या मंदिरामुळे केवळ हिंदूच नव्हे तर मुस्लिम लोकही शाकाहारी बनले आहेत. तसेच गावात येणाऱ्या पाहुण्यांनाही शाकाहारी भोजनाचा आनंद घ्यावा लागतो.
सांगली: आजकाल लोकांचा विशेषत: तरुण पीढीचा कल मासांहाराकडे असताना सांगली जिल्ह्याच्या दुष्काळी खानापूर तालुक्यातील रेणावी (Sangli Pure Vegetarian Village Renavi) हे संपूर्ण गावच शाकाहारी आहे. हे वाचल्यानंतर तुम्हालाही आश्चर्याचा धक्का बसला असेल ना? पण हो, खरं आहे. रेणावी हे गाव संपूर्ण शाकाहारी गाव असल्याचं ओळखलं जातंय. या गावात अठरापगड जाती -धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. तरीही गाव शाकाहारी आहे. हे गाव वर्षानुवर्षे शाकाहारी असण्यामागचे कारणही तसंच आहे.
Pure Veg Village Renavi: रेणवसिद्ध देवामुळे हिंदू-मुस्लिमही शाकाहारी बनले
सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील घाटमाथ्यावरील रेणावी हे गाव आहे. या गावचे आराध्य दैवत जागृत रेवणनसिद्ध हे असून या ठिकाणी नऊ नाथापैकी एक मंदिर आहे. याच देवस्थानमुळे हे गाव अनादिकाळापासून शाकाहारी आहे. कारण या देवाला मांसाहार चालत नाही. लोकाची देखील देवावर इतकी श्रद्धा आहे की गावातच नाही पण बाहेर, परगावी किंवा पाहुण्यांकडे देखील या गावची मंडळी मांसाहार करत नाही हे विशेष. शिवाय गाव शाकाहारी असल्याने गावात वाद-विवाद , भांडणे याचे प्रमाण देखील कमी आहे असा गावकऱ्यांचा समज आहे.
गावात लग्न होऊन आलेल्या सुनादेखील शाकाहारीच
राज्यातील रेणावी हे एकमेव गाव आहे जे संपूर्ण शाकाहारी गाव आहे. या गावात सर्व धर्माचे लोक राहतात. रेवणसिध्द महिमा असल्याने गाव शाकाहारी आहे. हिंदू- मुस्लिम यांच्यासह सर्व धर्मांचे लोक या गावात गुण्यागोविंदाने राहतात. सोने-चांदीच्या व्यवसायानिमित्त या गावातील लोक देशभर विखुरलेले आहेत. तरीही ते शाकाहारी आहेत. याहून विशेष म्हणजे या रेणावी गावी सून म्हणून येणारी सूनबाईदेखील या गावची सून झाल्यावर शाकाहारी होते. मुलगी पसंती आल्यानंतर मुलीस शाकाहारी राहण्याची तयारी आहे का असं विचारलं जातं. तिचा होकार आल्यानंतरच मग पुढील बोलणी होती आणि ती मुलगी नंतर मांसाहार सोडून देते.
चकुल्या हा पाहुण्यांसाठी खास मेनू
मग आख्खं गावच शाकाहारी असलेल्या या गावात येणाऱ्या पाहुण्यांचे स्वागत कोणता पदार्थ बनवून केले जात असेल असा प्रश्न तुम्हला पडला असेल. तर तो पदार्थ आहे चकुल्या. या चकुल्या पाहुण्यांचे स्वागत करण्याचा मेनू. हा पदार्थ खास पध्दतीने बनवून पाहुण्यांचे स्वागत केलं जातं.
गावात पै-पाहूणे आले म्हटलं की हमखास मांसाहाराचा बेत हे सर्वत्र चित्र आपण पाहतो. पण अनादिकाळापासून शाकाहारी असलेल्या या गावात पै-पाहूण्यांचे स्वागत देखील चकूल्या हा खास शाकाहारी पदार्थ बनवून केला जातो.