Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार? शरद पवारांचं मिश्कील भाष्य; म्हणाले, मी त्याचीच वाट बघतोय!
Sharad Pawar : महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगत आहे. याबाबत शरद पवारांनी भाष्य केलंय.
Sharad Pawar : एकीकडे महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रिपदावरून (Maharashtra Guardian Minister List) जोरदार रस्सीखेच सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी एकनाथ शिंदे यांना हटवून महायुतीत लवकरच नवा 'उदय' होईल, असा अंदाज वर्तवला होता. तर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला आता शिंदेंची गरज नाही. सामंत यांच्या सोबत दावोसमध्ये 20 आमदार असल्याचा खळबळजनक दावा त्यांनी केला होता. तर उदय सामंत (Uday Samant) यांनी शिवसेना ठाकरे गटाचे 4 आमदार, 3 खासदार, 10 माजी आमदार आणि काँग्रेसचे 5 आमदार लवकरच शिवसेना शिंदे गटत प्रवेश करतील, असा मोठा दावा केलाय. तर प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे केंद्रात लवकरच भाजपसोबत जाताना दिसतील, असे म्हटले. महाराष्ट्रातील या राजकीय घडामोडींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मिश्कील भाष्य केले आहे.
नेमकं काय म्हणाले शरद पवार?
आज शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांनी महायुतीत नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदावरून रस्सीखेच सुरु आहे. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप होणार, अशा चर्चा रंगल्या आहेत. याबाबत विचारले असता आम्ही वाट बघतोय. मी त्याचीच वाट बघतोय की हे कधी जातात पक्षातून, असे मिश्कील भाष्य त्यांनी केले. शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
ठाकरे टोकाची भूमिका घेतील, असे वाटत नाही
दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत स्वबळाचे संकेत दिले. याबाबतही शरद पवार यांनी भाष्य केले आहे. त्यांनी म्हटलंय की, दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे माझ्याकडे आले होते. आमच्यात या विषयासह इतर काही विषयांवर सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी काल त्यावर भाष्य केले. ते त्यांचे मत आहे. मात्र, त्यासाठी ते एकदम टोकाची भूमिका घेतील, असे मला वाटत नसल्याचे शरद पायांनी यांनी म्हटले आहे.
आणखी वाचा