Gaja Marne: गजा मारणे टोळीच्या मालमत्तांचा शोध; प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे; मारहाणीच्या घटनेने मारणेच्या अडचणी वाढणार?
Gaja Marne: आरोपींनी अशी संघटितपणे गुन्हेगारी करून बेकायदा मालमत्ता जमवली आहे का, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे.

पुणे : कोथरूड भागात 19 फेब्रुवारीला शिवजयंती दिवशी मिरवणुवेळी संगणक अभियंता देवेंद्र जोग या तरूणाला गुंड गजा मारणे टोळीतील गुंडांनी बेदम मारहाण केली. या प्रकरणाचा तपास कोथरूड पोलिसांकडून गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आलं आहे. मारणे आणि त्याच्या साथीदारांच्या मालमत्तांची माहिती संकलित करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. संबंधित तरुण व आरोपींमध्ये जुनी भांडणे आहेत का, तसेच त्यांचे इतर साथीदार कोण आहेत, आरोपींनी अशी संघटितपणे गुन्हेगारी करून बेकायदा मालमत्ता जमवली आहे का, याबाबत तपास करायचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे. गजानन मारणेला तीन मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
मारणे विरुद्ध तक्रार करण्यासाठी गुन्हे शाखेत स्वतंत्र कक्ष सुरू करण्यात आला आहे. भेलकेनगर परिसरात शिवजयंती निमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. त्या वेळी देवेंद्र जोग हे दुचाकीवरून निघाले होते. मारणे आणि साथीदार कोथरूड भागातील एका चित्रपटगृहात निघाले होते. मारणे कारमध्ये होता. त्याच्याबरोबर असलेले साथीदार कार आणि दुचाकीवरून निघाले होते. ओम तीर्थराम धर्मजिज्ञासू (वय 35), किरण कोंडिबा पडवळ (वय 31), अमोल विनायक तापकीर (वय 35, तिघे रा. शास्त्रीनगर, कोथरूड) श्रीकांत ऊर्फ बाब्या संभाजी पवार यांनी मारहाण केली. पवार हा मारणेचा भाचा असून, तो सध्या फरार झाला आहे.गुंड गजा मारणे, रुपेश मारणे यांनी साथीदारांना चिथावणी दिल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली आहे. विशेष मकोका' न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांनी मारणेता तीन मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे.
सीसीटीव्ही पडताळून इतर साथीदारांची नावे करणार निष्पन्न
या मारहाण प्रकरणाचा संपूर्ण तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आलेला आहे. त्यानुसार, विशेष न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयासमोर काल (मंगळवारी) दुपारी गजा मारणेला गुन्हे शाखेने हजर करण्यात आलं. त्यावेळी गजानन मारणे हा सराईत गुन्हेगार असून, त्यानेच साथीदारांना तक्रारदार तरुणाला भर चौकात जिवे मारण्यासाठी चिथावणी दिली होती. त्याच्या साथीदारांचा पोलिस शोध घेत असून, त्यांच्या ठावठिकाण्याबाबत तो उडवाउडवीची उत्तरे देत आहे. त्याच्या मोबाइलचा तपास सुरू असून, मारहाण झालेल्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे इतर साथीदार असल्यास त्यांची नावे निष्पन्न करायची आहेत. आरोपी संघटित गुन्हेगारी टोळीचा म्होरक्या असून, इतर आरोपी टोळीचे सदस्य आहेत. त्यांच्यावर विविध गंभीर गुन्हे दाखल असून, लोकांच्या मनात यांच्याबाबत मोठी दहशत आहे. त्यांनी अशा प्रकारे संघटित गुन्हेगारी करून बेकायदा मालमत्ता जमवली आहे का, याबाबत तपास करायचा आहे. त्यासाठी आरोपीला पोलिस कोठडी देण्याची मागणी विशेष सरकारी वकील विलास पठारे व सहायक आयुक्त गणेश इंगळे यांनी केली होती, युक्तीवादानंतर गजानन मारणे याला पुणे न्यायालयाने 3 मार्च पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली आहे. सहा दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
