मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी; सारंगी महाजनांची जमीन घेणारे गोविंद मुंडे समोर
सारंगी महाजन यांच्यासोबत झालेल्या जमिनीच्या संबंधित व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे तसेच रजिस्ट्री कार्यालयात देखील उपलब्ध आहे.
बीड : सारंगीताई महाजन यांच्या जमीन खरेदीचा व्यवहार हा पूर्णपणे त्यांच्या संमतीने झालेला असून, खरेदीखत रजिस्ट्री ही रजिस्ट्री ऑफिसमध्ये झालेली आहे. त्यांना व्यवहारात ठरलेली संपूर्ण रक्कम देखील दिलेली आहे. सारंगी ताई या सुशिक्षित असून, कुठल्याही कोऱ्या कागदावर सह्या कशा करू शकतात? त्यांनी केलेले आरोप बिनबुडाचे व चुकीचे आहेत, असे सारंगी महाजन यांची जमीन खरेदी करणारे परळीतील (Parli) रहिवाशी गोविंद मुंडे यांनी व्यक्त केले आहे. तसेच, मी धनंजय मुंडेंचा नोकर नसून परळीतील प्रतिष्ठीत व्यापारी असल्याचंही त्यांनी म्हटलंय. दरम्यान, सारंगी महाजन (Sarangi mahajan) यांनी जमीन व्यवहारप्रकरणी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असून माध्यमांना प्रतिक्रिया देताना मुंडे बंधु-भगिनीवर आरोप केले होते.
सारंगी महाजन यांच्यासोबत झालेल्या जमिनीच्या संबंधित व्यवहाराचे पूर्ण रेकॉर्ड माझ्याकडे तसेच रजिस्ट्री कार्यालयात देखील उपलब्ध आहे. हा व्यवहार सारंगीताई व माझ्यात झालेला असून या प्रकरणाचा मंत्री धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांचा दुरान्वये कसलाही संबंध नाही, असेही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. हा व्यवहार दोन वर्षांपूर्वी झालेला असून, आता दोन महिन्यांपूर्वी सारंगी महाजन यांनी या विषयी कोर्टात दावा दाखल केला असून, त्याविरुद्ध आपण आव्हान याचिका दाखल केली असल्याचेही गोविंद मुंडे यांनी स्पष्ट केले आहे. विशेष म्हणजे सदर व्यवहार पूर्ण झाल्यानंतर आपण जेवणासह सारंगी महाजन यांचा यथोचित पाहुणचार करून त्यांना स्वतःच्या गाडीतून मुंबईला सोडवले होते, सारंगी महाजन यांनी दिलेला दावा व त्याविरुद्ध मी केलेले आव्हान हे न्यायप्रविष्ट आहे. सारंगी यांनी विनाकारण या धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे यांचे या व्यवहाराशी कसलाही संबंध नसताना त्यांचे नाव जोडून चुकीचे व बिनबुडाचे आरोप करू नयेत, असेही गोविंद मुंडे यांनी म्हटले आहे. त्यामुळे, आता सारंगी महाजन व गोविंद मुंडे यांच्या व्यवहारात पंकजा मुंडे व धनंजय मुंडेंचा खरंच रोल आहे की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.
सारंगी महाजन यांचा दावा
दरम्यान, गोविंद मुंडे हा धनंजय मुंडेंच्या घरी नोकर म्हणून काम करत होता, तो पंडित अण्णा मुंडेंसाठी काम करायचा. त्यानंतर, त्याच्या घरात नगरसेवक करण्यात आलं, त्यामुळे त्याची आर्थिक परस्थिती सुधारली, जमीन, बंगला, पैशाने तो श्रीमंत झाल्याचे सारंगी महाजन यांनी म्हटलं होतं. तसेच, धनंजय मुंडे व पंकजा मुंडेंच्या संगनमतानेच त्यांनी माझी जमीन हडपल्याचा दावाही सारंगी महाजन यांनी केला होता.