Dada Bhuse Profile : रस्त्यावरचा शिवसैनिक ते सलग पाचवेळा आमदार, दादा भुसे पुन्हा एकदा मंत्रिपदी विराजमान
Dada Bhuse Profile : दादा भुसे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेना पक्षातून झाली आहे. ते सलग पाच टर्म मालेगाव बाह्य या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
Dada Bhuse Profile : महायुती सरकारमधील नव्या मंत्र्यांचा शपथविधी (Maharashtra Cabinet Expansion) आज पार पडला. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारात 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. भाजपच्या वाट्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह 20 मंत्रिपदे आली आहेत. शिवसेनेच्या वाटाला एकनाथ शिंदेंसह (Eknath Shinde) 12 मंत्रिपदे आली. तर राष्ट्रवादीला अजित पवारांसह 10 खाती मिळाली. यात शिवसेना शिंदे गटाकडून दादा भुसे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. जाणून घेऊयात दादा भुसे यांच्या राजकीय कारकिर्दीबाबत...
दादा भुसे यांच्या राजकारणाची सुरुवात शिवसेना पक्षातून झाली आहे. भुसे यांचा जन्म 6 मार्च 1964 रोजी मालेगाव येथे झाला. त्यांचे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. भुसे यांचे शिक्षण डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर इथपर्यंत झाले असून त्यांनी पंधरा वर्ष जलसंपदा विभागात शाखा अभियंता म्हणून काम केले. मात्र सामाजिक कार्याची आवड असल्याने त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला. त्यानंतर ते राजकीय क्षेत्राकडे वळाले. धर्मवीर आनंदजी दिघे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर व समाजकार्यावर प्रभावीत होऊन मालेगांव येथे 'जाणता राजा' मंडळाच्या माध्यमातून समाजकार्यास सुरुवात करत ते नंतर शिवसेनेत सक्रीय झाले. यावेळी भुसे यांनी सुरुवातीला शिवसेनेचे तालुकाप्रमुख म्हणून कामकाज सुरू केले. त्यानंतर 2004 साली त्यांनी विधानसभेची निवडणूक लढवली.
सलग पाच टर्म आमदार
भुसे यांनी 2004 साली मालेगाव बाह्य मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी केली होती. त्यावेळी त्यांच्यासमोर माजी राज्यमंत्री पुष्पाताई हिरे यांचे चिरंजीव प्रशांत हिरे यांच्या कडवे आव्हान होते. त्यांचा 9 हजार 17 मतांनी पराभव करून दादा भुसे विधानसभेत पोहोचले होते. त्यावेळी भुसे यांना 68 हजार 69 इतकी मते मिळाली होती. तर 2009 साली भुसे यांनी पुन्हा एकदा प्रशांत हिरे यांचा 30 हजार 64 मतांनी पराभव केला होता. त्यावेळी भुसे यांना पक्ष 95,137 मते मिळाली होती. तसेच 2014 साली भुसे यांना 82 हजार 093 इतकी मते मिळाली होती. त्यावेळी त्यांनी भाजपच्या पवन ठाकरे यांचा 37 हजार 41 मतांनी पराभव करत विजय मिळविला होता. तर 2019 साली 1 लाख 21 हजार 252 इतके मोठे मताधिक्य घेत काँग्रेसच्या तुषार शेवाळे यांचा 47 हजार 684 मतांनी पराभव करत विजय मिळविला होता. तर यंदाच्या 2024 सालच्या निवडणुकीत ठाकरेंच्या शिवसेनेचे अद्वय हिरे यांचा तब्बल 1 लाख 6 हजार 5 मतांनी पराभव करत विजय मिळविला. या निवडणुकीत भुसे यांना 1 लाख 57 हजार 405 इतकी मते मिळाली आहेत. भुसे हे सलग पाच टर्म मालेगाव बाह्य या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
आतापर्यंत 'ही' पदे भूषवली
त्याचप्रमाणे भुसे यांनी कृषी व माजी सैनिक कल्याणमंत्री, बंदरे व खनिकर्म, सार्वजनिक बांधकाम (सार्व. उपक्रम), रोजगार हमी योजना व फलोत्पादन यासारखे कॅबिनेट तर सहकार आणि ग्रामविकास भागाचे राज्यमंत्रीपद भूषविले आहे. तसेच नाशिक, धुळे आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री पद देखील त्यांनी भूषविले आहे.
भुसे सामाजिक कार्यात अग्रेसर
वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. दगडू बयाजी भुसे यांचा सामाजिक कार्याचा वारसा घेऊन त्यांनी सतत सक्रीय सहभाग घेत अनेक गरजुंना रक्तदान, गोर-गरीब विद्यार्थ्यांना मोफ़त वह्या व वॉटरबॅग वाटप, तसेच ना नफा ना तोटा तत्वावर वह्या वाटप, गोर-गरीब जनतेसाठी सर्वधर्मीय सामुदायीक विवाह सोहळा, मालेगांव सांस्कृतीक महोत्सवाचे आयोजन, आदिवासी सांस्कृतीक मेळावा, फिरता किर्तन महोत्सव कार्यक्रम, शिवमहापुराण कथा आयोजन, यासारखे कार्यक्रम केले आहेत. तर जनतेच्या सेवेप्रती तत्परता व तगडा जनसंपर्क त्यामुळे हिरे कुटुंबाला मतदारसंघातुन तडीपार केले. तसेच भुसे यांची नाळ शेतकरी कुटुंबाशी जोडलेली असल्याने कृषि मंत्री असतांना त्यांनी शेतकरी हिताचे चांगले निर्णय त्या काळात घेतले. याशिवाय बांधावरचा कृषि मंत्री म्हणूनही त्यांची ओळख आहे. तर नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून नाशिक जिल्ह्यासह शहराच्या विकासासाठी ते तत्पर असल्याचे आतापर्यंत दिसून आले आहे. तर मतदारसंघातील पिण्याच्या पाण्याचा व शेतक-यांचा जलसिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी गिरणा, मोसम व तालुक्यातील उपनद्यांवर शेकडो बंधारे बांधून शेतकऱ्यांचा पाणी प्रश्न त्यांनी सोडविला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके चांगली येऊन त्यांचे उत्पन्न वाढून जीवनमान उंचावण्यास मदत झाली.
मतदारसंघातील प्रभावी विकासकामे
- छत्रपती शिवाजी महाराज कृषि विज्ञान संकुल, काष्टी, ता. मालेगांव. एकाचवेळी ५ कृषि महाविद्यालय व १ तंत्रनिकेतन कॉलेजला मंजुरी.
- क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला व बाल रुग्णालय.
- मालेगांव तालुक्यातील शेतकऱ्यांना पिक विम्यापोटी १८४ रु. कोटींचा निधी मंजुर.
- मालेगांव तालुक्यातील संपुर्ण गावांचा 'पोकरा' योजनेत समावेश.
- नार - पार योजनेत मालेगांव तालुक्याचा समावेश.
- मॉडयुलर हॉस्पिटल, मालेगांव.
- खेळाडूंसाठी मालेगांव शहरात व तालुक्यात तालुका क्रीडा संकुलांची निर्मिती.
- सरकारी रुग्णालयांच्या खाटांची क्षमता वाढविली.
- शहरात व तालुक्यातील रस्ते क्राँक्रीटीकरण.
- क्रांतीज्योती सावित्रीआई फुले अभ्यासिका व संग्रहालय, मोसमपुल, मालेगांव.
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुर्णाकृती पुतळा.
- गिरणा, मोसम व उपनद्यांवर शेकडो बंधारे.
आणखी वाचा