Radhakrishna Vikhe Patil Profile : 30 वर्षे राजकारणात, 7 वेळा आमदार, आता पुन्हा मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांची A टू Z कारकीर्द!
स्वातंत्र्यानंतर अहमदनगरमध्ये आशियातील पहिली सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात महाराष्ट्रातील विखे-पाटील कुटुंबाचे मोठे योगदान आहे.
Radhakrishna Vikhe Patil Political Journey : 2024 महाराष्ट्र विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली. यामध्ये महायुतीला मोठं यश मिळालं. 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुती सरकारची स्थापना झाल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान, 15 डिसेंबर रोजी नागपुरात मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून महायुतीतील अनेक नव्या चेहऱ्यांना मंत्रिपदाची शपथ दिली.
राधाकृष्ण विखे पाटील नगरच्या राजकारणातील मोठं नाव
यामध्ये नगर जिल्ह्यातील शिर्डी विधानसभा मतदारसंघाचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna E. Vikhepatil) यांचा देखील समावेश आहे. विखे-पाटील घराणं हे राजकारणातील चांगले मोठे नाव आहे. कारण त्यांच्या घराण्यातील तिसरी पिढीही राजकारणात आली आहे. सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात नगर जिल्ह्यामध्ये विखे घराण्याचा कोणी हात धरू शकत नाही. आमदार राधाकृष्ण विखे-पाटील(Radhakrishna Vikhe Patil) यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, त्यांची राजकीय कारकीर्द कशी राहिलेली आहे, हे जाणून घेऊ या....
राधाकृष्ण विखे पाटील राजकारणात, बंधूंचे शैक्षणिक संस्थांकडे लक्ष
स्वातंत्र्यानंतर अहमदनगरमध्ये आशियातील पहिली सहकारी साखर कारखाना स्थापन करण्यात महाराष्ट्रातील विखे-पाटील कुटुंबाचे मोठे योगदान आहे. दिवंगत विठ्ठलराव विखे पाटील यांनी तत्कालीन काँग्रेस नेते धनंजयराव गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली साखर कारखान्याची स्थापना केली होती. विठ्ठलराव विखे पाटील यांचे पुत्र बाळासाहेब विखे पाटील तर राधाकृष्ण विखे पाटील, अशोक विखे आणि राजेंद्र विखे हे त्यांचे तीन मुलं. यांपैकी राधाकृष्ण विखे पाटील यांनी राजकारण सुरू ठेवलं, तर अशोक विखे यांनी शैक्षणिक संस्थांवर लक्ष केंद्रित केलं.
1986 मध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष
महाराष्ट्र राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला. त्यांचे आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील यांच्या प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेमध्ये अकरावीपर्यंतचे शिक्षण घेतले. अकरावीनंतर कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना त्यांच्यात सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. 1986 मध्ये ते युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष झाले असे म्हणता येईल की, तेव्हापासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. यादरम्यान, त्यांनी आजोबा विठ्ठलराव विखे-पाटील आणि वडील बाळासाहेब विखे पाटील यांच्या पावलावर पाऊल टाकून अहमदनगरमध्ये अनेक सामाजिक उपक्रम राबविले. ज्यामध्ये भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी असो की दुसरे काही.
1994 मध्ये पहिल्यांदा आमदार
राधाकृष्ण विखे-पाटील यांनी 1994 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून पहिली निवडणूक लढली. आता 30 वर्ष होत आले पण त्यांनी अजून मागे वळून पाहिले नाही, आजही या मतदारसंघाचे ते आमदार आहेत. राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील काँग्रेसमधून शिवसेनेत गेले होते. वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी आणि आपल्या आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता. त्यानंतर पोटनिवडणुकीत ते पुन्हा एकदा शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. बाळासाहेब विखे 40 वर्षं खासदार होते. शिवसेनेच्या कोट्यातून बाळासाहेब विखे यांनी वाजपेयी मंत्रिमंडळात केंद्रीय अर्थ राज्यमंत्री, अवजड उद्योग खात्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून काम पाहिलं. पण, शिवसेना-भाजप सरकार पडतंय हे लक्षात येताच, ते परत काँग्रेसमध्ये आले. आणि आमदार झाले.
2019 मध्ये काँग्रेसला रामराम, भाजपात प्रवेश
2014 मध्ये देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आली, त्यावेळी राधाकृष्ण विखे यांनी 5 वर्षं राज्यात विधान सभेतील विरोधी पक्षनेते म्हणून भूमिका बजावली. पण 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मुलगा सुजय विखे-पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राज्याचे विरोधी पक्षनेते असतानाही विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊन राधाकृष्ण विखे यांनी मुलासोबत भाजपमध्ये गेले.
राधाकृष्ण विखे पाटील -
महसूलमंत्री - (2022-2024)
गृहनिर्माणमंत्री - (2019-1019)
विरोधी पक्षनेता (महाराष्ट्र विधानसभा)- (2014-2019)
कृषीमंत्री, अन्न व औषधनिर्माण विभाग, मराठी भाषा, इतर मागासवर्ग विभाग मंत्री (2010-2014)
परिवहनमंत्री, बंदरे, विधी व न्यायविभागाचे मंत्री- (2009-2019)
शालेय शिक्षणमंत्री- (2008-2009)
कौशल्यविकास आणि उद्योजकता विभागााचे मंत्री (1995-1999)