Nashik Crime : फसवणुकीचा नवा फंडा! राजकीय नेत्याचा स्वीय सहाय्यक असल्याचं भासवलं, तीन कोटींचा गंडा
Nashik Crime : नाशिक शहरात बेरोजगारांना (Unemployed) पावणे तीन कोटींचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
Nashik Crime : नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून अनेक फसवणुकीचे प्रकार समोर आले आहेत. नाशिकमध्ये (Nashik) देखील असाच एक प्रकार समोर आला आहे. माझ्या मंत्रालयात खूप ओळखी असून सरकारी विभागांमधील अधिकाऱ्यांकडे माझे नेहमीच येणे जाणे आहे. त्यामुळे तुम्हाला सरकारी नोकरी मिळवून देतो, असे सांगत संशयिताने काही बेरोजगारांना (Unemployed) पावणे तीन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे.
सध्याच्या ऑनलाईनच्या (Onilne) जगात अनेक फसवणुकीचे प्रकार (Fraud) उघडकीस येत आहेत. याचबरोबर अनेक संशयित बेरोजगार युवकांना विश्वासात घेऊन नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून लुबाडणूक करत असल्याचे समोर आले आहे. शहरातील सुशील भालचंद्र पाटील (Sushil Patil) या संशयिताने हीच बाब हेरुन अनेक बेरोजगारांची फसवणूक केली आहे. पोलिसांच्या लक्षात येताच तपास करत पाटील यास ताब्यात घेतले असून न्यायालयात दाखल केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी अनिल अशोक आव्हाड यांनी देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली.
आव्हाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार माझ्यासह काही नातेवाईकांची एक जानेवारी 2018 ते 5 एप्रिल 2023 या कालावधीत फसवणूक झाल्याचे आव्हाड यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. या प्रकरणात तब्बल 2 कोटी 76 कोटी रुपयांचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून संशयित पाटील यास गुरुवारी न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
पोलीस तपासात रंजक माहिती
दरम्यान पोलीस तपासात पाटील यांच्याबाबत रंजक माहिती समोर आली आहे. पाटील याचे राहणीमान उच्चभ्रूसारखे असायचे. समोरच्या व्यक्तीचा विश्वास संपादित करण्याचीही कला पाटीलकडे आहे. त्याच्या आलिशान कारवर आमदार किंवा विधानभवनाचा पास लावलेला असायचा. राज्यातील बड्या नेत्यांशी, अधिकाऱ्यांशी निकटचे संबंध असल्याचे पाटील भासवत असे. सरकारी नोकरी लावून देतो, सरकारी योजनांमध्ये गुंतवणूक केल्यास त्यावर आकर्षक परतावा मिळवून देतो, असे आमिष दाखवून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची माहिती पोलीस तपासातून पुढे आली आहे.
अनेकांना बनावट नियुक्तीपत्रे दिली
मी एका राजकीय नेत्याचा स्विय सहाय्यक असल्याचे पाटील सांगत असे, अशी प्राथमिक माहिती तपासात पुढे आली आहे. समाजकल्याण विभाग, उत्पादन शुल्क विभाग अशा काही सरकारी विभागांत नोकरी मिळवून देतो, असे तो सांगत असे. याशिवाय काही जणांना त्याने बनावट नियुक्तीपत्रे दिल्याचे समजते. ई. टॉयलेट किंवा अन्य सरकारी योजनांमध्ये तुमच्याकडील पैसे गुंतवल्यास त्यावर आकर्षक परतावा मिळवून देतो, असे आमिष देखील पाटील दाखवत असे. त्यामुळे अनेक जण या आमिषाला बळी पडले असण्याची शक्यता आहे.