(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Police : नाशिक पोलिसांनी दोनशे तळीरामांची रस्त्यावरच उतरवली, लाखांचा दंडही वसूल केला!
Nashik Police : थर्टी फर्स्टच्या निमित्ताने धिंगाणा करणाऱ्या नाशिककरांना पोलिसांनी घरचा रस्ता दाखवला.
Nashik Police : नाशिक (Nashik) शहरासह ग्रामीण भागात सुद्धा पोलिसांनी (Nashik Police) नववर्ष स्वतःच्या निमित्ताने कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. शहर पोलीस आयुक्तालयात प्रत्येक पोलीस ठाणे साधित मुख्य रस्त्यांवर चौका चौकात नाकाबंदी देखील करण्यात आली होती. यावेळी शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास मध्य प्राशन करून वाहन चालवणाऱ्या सुमारे 200 पेक्षा जास्त तळीरामांची पोलिसांनी रस्त्यावरच नशा उतरवली.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शनिवारी थर्टी फर्स्टच्या (31 December) निमित्ताने अनेक नाशिककरांना पोलिसांनी घरचा रस्ता दाखवला. नाशिक शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी असल्यामुळे पोलिसांनी अनेक तळीरामांची मुसक्या आवळून त्यांना नवीन वर्षाच्या हटके शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरासह जिल्ह्यात रात्रीच्या सुमारास प्राशन करून वाहन चालविणाऱ्या सुमारे 200 पेक्षा जास्त तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली. तसेच वाहतूक नियमांचे उल्लंघन करत धुमस्टाईल बेदरकारपणे वाहने दामटविणाऱ्यानाही खाकीचा हिसका दाखवला.
सरत्या वर्षाला निरोप देत नववर्ष स्वागतासाठी लोकांनी तयारी करत पार्टीचा बेत आखून धमाल केली. शनिवारी रात्री उघड्यावर पार्टी करताना सापडलेल्या तळीरामांना संबंधित पोलीस ठाण्याच्या गस्ती पथकाने ताब्यात घेत वाहन डांबून ठाण्यांची सफर घडवली. शहराच्या हद्दीत मद्य प्राशन केलेल्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. नाशिक शहरातील बहुतांश रेस्टॉरंटमध्ये रात्री साडेअकरा वाजण्याच्या पुढे नागरिकांना प्रवेश दिला गेला नाही. व्यावसायिकांनी नियमांचे पालन करत नववर्ष सेलिब्रेशनच्या संधीचे सोने केल्याचे दिसून आले.
नाशिक शहरातील सर्व हॉटेल्सच्या परिसरात रोषणाई करण्यात येऊन सजावट करण्यात आली होती तर पोलिसांकडून रात्रभर रस्त्यावरील चौकांमध्ये कडाक्याच्या थंडीत कर्तव्य बजावताना दिसून आली. दरम्यान पोलिसांकडून मद्यपींची तपासणी करण्यासाठी वापरला जाणाऱ्या ब्रेथ अनालायझर यंत्राचा वापर पोलिसांनी टाळला. कारण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही खबरदारी आयुक्तांच्या आदेशांवर घेण्यात आली होती. मात्र ग्रामीण पोलिसांनी पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार ब्रेथ अँनालायझरचा वापर करत मद्यपीवर कारवाई केली.
नाशिक पोलिसांकडून विशेष मोहीम
दरम्यन नाशिक शहर पोलिसांनी दिवसभरात एकूण 1643 वाहनांची तपासणी करण्यात आली. यातील 145 वाहनांवर कारवी करण्यात आली. यामध्ये ३१ वाहने जमा करण्यात आली. कर्कश आवाज करणे, बेदरकारपणे वाहन चालविणे यामुळे पोलीस ठाण्यांत जवळपास ३१ वाहने जमा करण्यात आली. तर यांच्याकडून 56 हजार 200 रुपये दंडही वसूल करण्यात आला आहे. नाशिक शहरातील गुन्हेशाखा युनिट-1 व 2 चे प्रभारी अधिकारी यांना बंदोबस्तादरम्यान विशेष मोहिम राबवुन रेकॉर्डवरील, शरिरा विरूध्दचे, माला विरूध्दचे व दहशत पसरविणारे गुन्हेगार चेकींग करून कारवाई करणे, पोलीस ठाणे हददीत महत्वाच्या ठिकाणी नाकाबंदी दरम्यान वाहने तपासणे, कर्कश आवाज, बेदरकारपणे वाहन चालविणे, दारू पिऊन वाहन चालविणे अशा वाहन धारकावर कारवाई करणे, अवैध दारू विक्री करणारे, टवाळखोर इसमांवर कारवाई, रात्री उशिरा पर्यंत हॉटेल/आस्थापना चालविणे अशा कारवाया करणेबाबत आदेश देण्यात आलेले होते. त्यानुसार सर्व पोलीस ठाणे हददीत बंदोबस्त दरम्यान पोलिसांकडून कारवाई करण्यात आली.
ग्रामीण पोलिसही सुसाट
दरम्यान 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिसांनी देखील चांगलीच मोहीम राबविण्यात आली. नाशिक जिल्हयातील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी ड्रंक अँड ड्राईव्हच्या एकुण 134 केसेस करण्यात आलेल्या असुन सदर कारवाईत 79 हजार 100 रूपये दंड वसुल करण्यात आलेला आहे. अवैधरित्या मद्याची विक्री व वाहतुक या सदराखाली एकुण 53 केसेस करण्यात आलेल्या असुन 7 लाख 84 हजार 380 रूपये किंमतीतचा मुद्देमला, तसेच अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार सदराखाली एकुण 07 केसेस करण्यात आलेल्या असुन 14 लाख 01 लाख 715 रूपये किंमतीचा मुद्देमाल आहे. तसेच मालाविरूध्द व शरिराविरूध्दचे गुन्हे करणारे आरोपींवर सी.आर.पी.सी. प्रमाणे एकुण 18 प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या आहेत.