Chhagan Bhujbal : अदानींमुळे आगामी काळात वीज आणखी महागणार, छगन भुजबळांचा टोला
Chhagan Bhujbal : तुम्हाला वीज जरी MSEB पुरवत असली तरी निर्माण करण्यासाठी लागणारा कोळसा अदानीचा आहे, असा टोला छगन भुजबळांनी लगावला आहे.
Chhagan Bhujbal : आगामी काळात वीज (Power Supply) आणखी महागणार आहे, याचे कारण म्हणजे अदानी आहे. तुम्हाला जरी वीज MSEB पुरवत असली तरी निर्माण करण्यासाठी लागणारा कोळसा अदानीचा आहे. कोळसा उतरवणारी जहाजे अदानीची आहेत, जिथे उतरतात ती बंदरे त्यांची आहेत आणि अदानी आत्ता भयंकर तोट्यात आहे, हा तोटा उद्या तुमच्या खिशातून वसूल केला जाईल, अशी टीका छगन भुजबळांनी केली.
ग्रामोन्नती मंडळ, कृषी विज्ञान केंद्र, नारायणगाव (Pune) येथे आयोजित ग्रामोन्नती कृषी सन्मान 2023 पुरस्कार वितरण सोहळा, शिवजन्मभूमीची आम्रगाथा व आंबा पिक उत्पादक मार्गदर्शिका पुस्तक प्रकाश सोहळा पार पडला. यावेळी आयोजित कार्यक्रम प्रसंगी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) बोलत होते. केंद्र सरकारने संगितले की आम्ही शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजना देऊ त्याचे 6 हजार वर्षाला देऊ परंतु अनेक शेतकऱ्यांना मिळाले पण हेच पैसे आता परत घेतले जाणार आहेत. काहीतरी कारण काढून शेतकऱ्यांना अपात्र घोषित केले जात आहे आणि त्यांच्याकडून आता हे पैसे परत घेतले जाणार आहे. नुकसान झाले शेतकऱ्यांचे तर नुकसान भरपाई वेळेवर दिली जात नाही. कृषिप्रधान असलेल्या देशातील शेतकरी उपेक्षित का राहत आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
आपला देश हा कृषिप्रधान देश असून देशाची संपूर्ण अर्थ व्यवस्था ही कृषि क्षेत्रावर निगडित आहे. त्यामुळे आज कितीही शहरीकरण झाले असले तरी ग्रामीण भागासाठी विशेषतः शेतीसाठी विशेष निधीची तरतूद करण्याची नितांत आवश्यकता आहे. तसेच या क्षेत्राचे प्रश्न सोडविण्यासाठी प्राधान्याने विचार करण्याची गरज आहे, असे भुजबळ म्हणाले. मुलांना नावीन्यपूर्ण शिक्षण देण्यासाठी केंद्राच्या वतीने अतिशय काळजी घेण्यात आली आहे. सर्व समाजातील बांधवांना शिक्षण मिळालं पाहिजे, यासाठी परिसरातील सत्यशोधक समाजातील समाजधुरिनांनी दर्जेदार शिक्षण संस्था उभ्या केल्या असून अनेक विद्यार्थी यातून शिक्षण घेऊन यशस्वी होत आहे.
वीजेचे खाजगीकरण होत आहे...
आपल्या देशातून बांगलादेशात सर्वाधिक द्राक्ष निर्यात होते, मात्र सीमा शुल्क वाढविल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे अशी टीका त्यांनी केली. देशात विजेचे खाजगीकरण होत असून अदानी सारख्या उद्योजकांना संस्था विकल्या जात आहे. त्यामुळे लवकरच विजेच्या दराचा बोजा तुम्हा आम्हावर पडणार असल्याचे त्यांनी सांगितले. शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. देशात शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केले तर शेजारच्या श्रीलंका आणि पाकिस्तान प्रमाणे आपल्या देशाची परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे शेतकऱ्यांना शासनाने अधिक मदत करण्याची गरज असून त्यांच्यासाठी विशेष तरतूद करण्याची आवश्यकता आहे. तसेच देशाच्या शैक्षणिक धोरणात देखील बदल केले जात असून इतिहास बदलण्याचे प्रयत्न केला जात आहे. सध्या सत्ताधारी हे प्रचंड ज्ञानी असून कधी काय वक्तव्य करतील त्यांचा भरोसा नाही अशी मिश्किल टिप्पणी त्यांनी यावेळी केली.