Nashik Crime : नागासाधु बनून आले अन् दोन वृद्धांना लुटलं! नाशिकमध्ये चोरट्यांचा नवा फंडा
Nashik Crime : नाशिकची (Nashik) मध्ये चक्क नागासाधूच्या (Nagasadhu) रूपात आलेल्या चोरांनी दोन वयस्कर नागरिकांच्या सोनसाखळी लंपास केल्याची घटना घडली आहे.
Nashik Crime : खरं तर धार्मिक नगरी सोबतच कुंभनगरी म्हणून नाशिकची (Nashik) ओळख.. मात्र याचाच फायदा आता चोरटे घेऊ लागले आहेत. चक्क नागासाधूच्या (Nagasadhu) रूपात आलेल्या चोरांनी दोन वयस्कर नागरिकांच्या सोनसाखळी लंपास केल्या असून चोरटे अजून पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. विशेष म्हणजे चोरांनी संमोहन केल्याचाही संशय व्यक्त केला जातोय. नाशिक मधील गुन्हेगारीवर (Crime) आळा बसणार तरी कशी असाच प्रश्न आता उपस्थित होतो आहे.
आजवर नाशिककरांनी फक्त कुंभमेळ्यातच (Kumbhmela) नागासाधू बघितले होते मात्र आता चक्क नागासाधूंच्या वेशात भल्या पहाटे येऊन चोरटे वयोवृद्ध नागरिकांना लक्ष्य करत असल्याच्या दोन धक्कादायक घटना नाशिकमध्ये समोर आल्या आहेत. शहरातील मुंबई नाका आणि म्हसरूळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मंगळवारी अर्ध्या तासाच्या आतच या घटना घडल्या आहेत. म्हसरूळ (Mhasrul) परिसरात पहाटे सव्वा सहा वाजता भागीरथ शेलार यांची एक तोळ्याची सोनसाखळी लंपास करत चोरटे निघाले आणि त्यांनी मुंबई नाका परिसरातील गोविंदनगरमध्ये रेकी करण्यास सुरुवात केली. गोविंदनगरला राहणारे उत्तम परदेशी हे 75 वर्षीय आजोबा 06 वाजून 38 मिनिटांनी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले याचवेळी 06 वाजून 40 मिनिटांनी चोरटयांनी नजर त्यांच्यावर पडली आणि 06 वाजून 42 मिनिटांनी चोरांची फोर व्हीलर परदेशी आजोबांजवळ येऊन थांबली. गाडीत ड्रयव्हर सीट शेजारी नागा साधूचा वेश धारण करून म्हणजेच नग्न अवस्थेत बसलेल्या एकाने आजोबांना पत्ता विचारण्याचा बहाणा केला आणि पुढे काय झालं ते परदेशी आजोबांकडूनच ऐका..
उत्तम परदेशी, तक्रारदार आजोबा (मी पत्ता सांगताच त्या नागा साधूने मला आशीर्वाद म्हणून माझ्या डोक्यावर हात ठेवला त्यानंतर बाबाने काही मंत्र म्हणत फा फु करत एक रुद्राक्ष आणि 50 रुपयांची नोट माझ्या हातात ठेवली त्यानंतर मला काही सुचत नव्हते, जीभ जड पडली, चक्कर सारखे वाटत होते. नंतर बाबाने माझ्या हातातील घड्याळ काढून घेतले आणि परत दिले मात्र नंतर माझ्या गळ्यातील दोन टोळे सोन्याची चेन मागताच मी त्यांना दिली आणि ते निघून गेले. त्यानंतर मी गार्डन मध्ये जाऊन बसून तिथल्या काही लोकांना सांगितले कि मला कसे तरी होते आहे काही सुचत नाही. लोकांनी मला घरी आणून सोडले)
गोविंदनगर परिसरातील हा सर्व प्रकार सिसीटिव्ही कॅमेरात कैद झाला आहे. चोरटयांनी एऑन चारचाकी गाडीचा गुन्ह्यात वापर केला असून तिन ते चार जणांची ही टोळी असल्याचा संशय आहे. विशेष म्हणजे सिसीटीव्ही फुटेज हाती येऊन देखिल चोरटे अजून पोलिसांच्या हाती लागले नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जातय. याप्रकरणी मुंबई नाका आणि म्हसरूळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू असल्याची माहिती पोलिस उपायुक्त विजय खरात यांनी दिली आहे.
नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासुन गुन्हेगारीने चांगलंच डोकं वर काढलय. प्राणघातक हल्ले, चोऱ्या, घरफोडी असे प्रकार हे रोजचेच झाले असतांनाच आता जबरी लुटीचेही प्रकार समोर येऊ लागल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. नाशिकच्या मध्यवर्ती सीबीएस परिसरात दोनच दिवसांपूर्वी २७ किलो चांदीच्या लुटीची घटना घडली होती, त्यातील आरोपीही अजून फरार आहे आणि हा प्रकार ताजा असतांनाच नागासाधूच्या रूपातील चोरांनी आता पोलिसांना आव्हान दिल असून गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे ऍक्शन मोड मध्ये येणार तरी कधी ? हाच प्रश्न आता उपस्थित होतोय..