Nashik News : राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायदा महत्वाचा का आहे? नेमकी कारणे काय?
Nashik News : राज्यात अंधश्रद्धा विरोधी कायद्याची नितांत आवश्यकता असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.
Nashik News : एकीकडे महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात आल्यापासून अनेक घटनांना आळा बसला. अनेक घरे उध्वस्त होण्यापासून वाचली. मात्र अशातच आता हा कायदा रद्द करण्याची मागणी केली जात आहे. हिंदूंविरोधी कायदा असल्याने तो रद्द करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे . मागील काही घटनां लक्षात घेता महाराष्ट्रात हा कायदा किती महत्वाचा आहे हे अधोरेखित होते.
गेल्या दोन दिवसांपासून महाराष्ट्र अंनिसचे श्याम मानव (Shyam Manav) आणि बागेश्वर धाम बाबा (Bageshwer Dham) यांच्यात जोरदार चर्चा सुरु आहे. काही दिवसांपूर्वी नागपूर येथे दिव्य दरबार भरविलेल्या बाबाने भक्तांच्या नावे न माहिती करता सांगत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या प्रकरणी श्याम मानव यांनी हा दावा खोटा ठरवत दावा सिद्ध केल्यास तीस लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले. यानंतर बाबाने श्याम मानव यांना रायपूरला आयोजित दिव्य दरबारला निमंत्रित केले. यावरून सगळा गदारोळ सुरु आहे. मुळात महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य असून अशा प्रकारे दिव्य दरबार भरवून लोकांची फसवणूक होत असल्याने अंधश्रद्धा विरोधी कायद्याची नितांत आवश्यकता असल्याचे अंनिसचे म्हणणे आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) हे पुरोगामी राज्य असुन अनेक संत व समाजसुधारक यांची परंपरा राज्यास लाभली आहे. परंतु भोळ्या भक्तांमधील अज्ञान अंधश्रद्धा या प्रगतीस घातक ठरत होत्या. हे फक्त एका धर्मात नव्हे तर सर्व धर्मात घडत असल्याने जादूटोणा कायदा आवश्यक आहे. डाॅ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनानंतर महाराष्ट्रात जादूटोणा विरोधी कायदा लागू झाला. असा कायदा करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे. या कायद्याला नऊ वर्ष पूर्ण झाली आहेत. दिड हजाराहून अधिक गुन्हे या कायद्याअंतर्गत दाखल झाले आहेत. हा कायदा केवळ हिंदू धर्मातील लोकांना लागू पडेल, असा आरोप काही लोकांनी केला होता, आजही करत आहेत. पण हा कायदा सर्व धर्मासाठी लागू आहे, असे अंनिसने म्हटले आहे.
पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद
दरम्यान अंनिसच्या मते पहिला गुन्हा मुस्लिम भोंदुच्या विरोधात नांदेड येथे तर दुसरा गुन्हा नाशिक रोड येथे नवबौद्ध समाजातील आरोपीच्या विरोधात दाखल झालेला आहे. नंतर हिंदु आरोपीच्या विरोधात दाखल झाला आहे. पहिल्या शंभर गुन्ह्यांची नोंद महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने ठेवली आहे. त्यात शंभरपैकी वीस घटनांमध्ये मुस्लिम व्यक्तींच्या विरोधात गुन्हे दाखल झाले आहे. लोकसंख्येचा विचार करता हे प्रमाण लक्षणीय आहे. नाशिकमध्ये (Nashik) काही हिंदुत्ववादी संतांनी रामकुंड येथे जमत जादूटोणा विरोधी कायदा रद्द करावा अशी मागणी केली आहे. त्यामुळे या कायद्याबाबत गैरसमज पसरविण्यांना कृतिशील उत्तर मिळाले आहे.
कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होणं आवश्यक...
या घटनांत नरबळी देणे अथवा देण्याचा प्रयत्न करणे, करणी भानामती,जादूटोणा अथवा भुत उतरवण्याच्या बहाण्याने अंगाला चटके देणे, त्यासाठी जबरदस्तीने मानवी विष्ठा खाऊ घालणे, मारहाण करणे,चमत्काराचा दावा करून स्त्रींयांचे लैंगिक शोषण करणे, गुप्तधन काढण्याच्या हेतुने अघोरी प्रथांचा अवलंब करणे, दैवी शक्तींचा दावा करून महिलांना नग्नपूजा करण्यास जबरदस्ती करणे, डाकिण समजुन त्रास देणे, पैशाचा पाऊस पाडण्याच्या बहाण्याने फसवणूक करणे, आदी अमानुष घटनांमुळे गुन्हे नोंद झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कायद्याचा प्रचार प्रसार करत आहे. मात्र मर्यादा व क्षमता याचा विचार केल्यास हे प्रयत्न अपुरे आहे. तरी या कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा, या कायद्याचे नियम बनवावेत व कायदा अधिक कडक करावा, अशी मागणी महाराष्ट्र अंनिसचे पदाधिकारी डाॅ.टी.आर.गोराणे, कृष्णा चांदगुडे व ॲड समीर शिंदे, महेंद्र दातरंगे यांनी केली आहे.