कहरच... ZP शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्स, बिभत्स नृत्याविष्कार; कारवाईची मागणी
गावातील यात्रेच्या नावाखाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नांदेड : शाळा हे पवित्र मंदीर मानलं जातं, शाळेच्या (School) वर्गात विद्यार्थी आयुष्यातील भविष्याचे धडे गिरवतो. तर, शाळेच्या मैदानातूनच भविष्याची स्वप्ने पाहतो. लहानपणीचे संस्कार आणि शिकवणीची शिदोरी याच मंदिरातून विद्यार्थ्यांना मिळते. त्यामुळे, आपली शाळा ही संस्कारक्षम आणि संस्कृतीरक्षक मानली जाते. मात्र, याच शाळेच्या मैदानावर सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली बॉम्बे डान्स (dance) करण्यात आल्याने आता तीव्र संताप व्यक्त होत आहे. ग्रामस्थांसह विविध संघटनांकडून या कृत्यावर आक्षेप घेत कारवाईची मागणी केली जात आहे.
गावातील यात्रेच्या नावाखाली येथील जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्सचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावरून संताप व्यक्त होत असून आयोजकांवर कारवाई करण्याची मागणी समता परिषदेने केली आहे. गावातील यात्रेसाठी गावच्या जिल्हा परिषदेचे मैदान वापरण्यास घेतले होते. दरम्यान, यात्रेसाठी घेतलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर बॉम्बे डान्ससारखा बिभत्स नृत्याचा कार्यक्रम पार पडल्याचा प्रकार नांदेडमध्ये उघड झालाय. नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे गावची यात्रा होती. या यात्रेदरम्यान 9 डिसेंबर रोजी जिल्हा परिषद शाळेच्या मैदानावर रात्री सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली बॉम्बे डान्स आयोजित करण्यात आला होता.
हिंदी, मराठी गाण्यांच्या तालावर इथे नृतक महिलांनी बॉम्बे डान्स केला. पण, यासाठी शाळेचे मैदान वापरले गेल्याने याबाबत समता परिषदेने जिल्हाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली. या बॉम्बे डान्सचे आयोजन करणाऱ्या अयोजकांसह शाळेचे मुख्याध्यापक आणि जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी समता परिषदेच्या संघरत्न गायकवाड यांच्याकडून निवेदन देऊन करण्यात आली आहे. दरम्यान, शाळा मुख्याध्यापक यांनी मैदान देण्यापूर्वी कार्यक्रमाची रूपरेषा समजावून घेतली नव्हती का, याबाबत त्यांना ज्ञात होते की नाही, या प्रश्नांची उत्तरे देखील लवकरच समोर येतील. तर, जिल्हा परिषद प्रशासनाकडून शाळेच्या मुख्याध्यापकांवर काय कारवाई केली जाईल, हे पाहावे लागेल.
हेही वाचा
मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'