मोठी बातमी! मंत्रिमंडळ विस्तार आता मुंबईऐवजी नागपुरात; समोर आलं राज'कारण'
महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार आहेत.
मुंबई : विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर राज्य सरकार स्थापन झाल्यानंतर आता मंत्रिमंडळ विस्ताराची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 16 डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यापूर्वीच म्हटलं होतं. त्यानुसार महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार शनिवारी होण्याची शक्यता असून राजभवनात शपथविधीच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे वृत्त आले होते. मात्र, आता थेट नागपूरलाच (Nagpur) महायुती सरकाच्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदारांची सोय व्हावी, या उद्देशाने शनिवारऐवजी रविवारी मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, तिन्ही पक्षातील बडे नेते आपल्या मंत्रिपदासाठी आग्रही आहेत. मात्र, यंदा भाजपकडून नव्या चेहऱ्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
महायुती सरकारच्या मंत्रिपदाच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब झालं असून लवकरच नवीन मंत्री शपथ घेणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, राष्ट्रवादीचे 10, शिवसेनेचे 12 आणि भाजपचे 21 मंत्री शपथ घेणार आहेत. त्यामध्ये कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपदाचा समावेश आहे. या मंत्रिपदाची संभाव्य नावे समोर आली आहेत. मात्र, ऐनवेळी या नावांवर शिक्कामोर्तब होऊन अधिकृतपणे ती जाहीर केली जाऊ शकतात. त्यामध्ये, काहीसे बदलही होण्याची शक्यता आहे. मात्र, नव्या मंत्र्यांचा शपथविधी आता नागपूरला होणार असल्याचे समजते.
आमदारांच्या सोईसाठी शपथविधी 15 तारखेला नागपुरात होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 16 तारखेपासून विधीमंडळाचं अधिवेशन असल्यामुळे 15 तारखेला नागपुरात शपथविधी होऊ शकतो, अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे, मुंबईतील राजभवनऐवजी आता नागपुरातच तयारीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, नागपुरात पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.
राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून लॉबिंग
दरम्यान, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं देण्यात येणार असून त्यामध्ये 8 कॅबिनेट तर 2 राज्यमंत्रिपदं असणार आहेत. त्यासाठी आता नेत्यांनी लॉबिंग सुरू केल्याचं चित्र आहेत. माजी मंत्री हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांची देवगिरी निवासस्थानी भेट घेतली. तर त्याआधी माजी मंत्री धर्मराव बाबा अत्राम यांनीही अजित पवारांची भेट घेतली होती. त्याचवेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे देखील उपस्थित असल्याची माहिती आहे.
शिवसेनेचे संभाव्य कॅबिनेट मंत्री
एकनाथ शिंदे
उदय सामंत
शंभुराज देसाई
दादा भुसे
प्रताप सरनाईक
संजय शिरसाट
गुलाबराव पाटील
भरत गोगावले
शिवसेनेचे संभाव्य राज्यमंत्री
योगेश कदम
विजय शिवतारे
राजेंद्र यड्रावकर किंवा प्रकाश आबिटकर
हेही वाचा
... अखेर तो आरोपी डॉ. बाबासाहेबांच्या फोटोसमोर नतमस्तक; रुग्णआलयातील व्हिडिओ व्हायरल