(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Tejas Thackeray | आजच्या दसरा मेळाव्यात तेजस ठाकरेंचं लाँचिग होणार?
आज शिवसेनेच्या (Shivsena) दसऱ्या मेळाव्यात ठाकरे घराण्यातील चौथी पिढी म्हणजे तेजस उद्धव ठाकरे (Tejas Thackeray) यांचं राजकारणात लाँचिग होण्याची शक्यता आहे.
मुंबई : आज शिवसेनेचा दसरा.. शिवसेनेचा दसरा मेळावा हा महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासाचा अविभाज्य घटक झाला आहे. या दसरा मेळाव्यात शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. आजचा दसरा मेळावा पुढील वर्षी होऊ घातलेल्या मुंबई आणि राज्यातील अन्य महापालिका निवडणुकांच्या आधी होत असलेला मेळावा आहे. आजच्या मेळाव्यातील उद्धव ठाकरे यांच्या भाषणाप्रमाणेच तेजस ठाकरे राजकारणात कधी उतरतो याची उत्सुकता केवळ शिवसैनिकांच नव्हे तर राज्यातील अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांनाही आहे. हाच तेजस आज सक्रिय राजकारण उतरणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
शिवसेनेचा दसरा मेळावा आता काही वेळातच षण्मुखानंद हॉलमध्ये भव्य प्रमाणावर साजरा केला जाणार आहे. मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे प्रथमच शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत. गेल्या वर्षी दसरा मेळावा ऑनलाईन झाला होता. यंदा मात्र शिवैसनिकांच्या उपस्थितीत हा दसरा मेळावा आयोजित केला जात आहे.
BLOG | महाराष्ट्रात नवीन ठाकरे!
एक पक्ष, एक नेता, एक मैदान आणि दसरा मेळावा असा अनोखा विक्रम शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला आहे. शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच आयोजित केला जात असतो. अपवाद वगळता त्याचे स्थान बदलले गेले आहे. अशाच एका दसरा मेळाव्यात म्हणजेच ऑक्टोबर 2012 मध्ये शिवसेना प्रमुखांनी आदित्य उद्धव ठाकरे यांच्यावर युवा सेनेची जबाबदारी सोपवली. यावेळी बाळासाहेबांनी उपस्थित शिवसैनिकांना भावुक आवाजात आवाहन करीत उद्धव आणि आदित्यला तुमच्या हवाली करीत आहे. त्यांना सांभाळून घ्या असे म्हटले होते. बाळासाहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद देत शिवसैनिकांनी या दोघांनाही सांभाळून घेतले. त्यामुळेच आज हे दोघेही सत्ताधीश झाले आहेत.
बाळासाहेब ठाकरे यांनी 1997 च्या महापालिका निवडणुकीची संपूर्ण जबाबदारी उद्धव ठाकरे यांच्यावर सोपवली होती. तेव्हा उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची व्यूहरचना तयार केली होती. उद्धव ठाकरे यांनी तर तेव्हा जवळ जवळ 45 विद्यमान नगरसेवकांची तिकीटे कापली होती. उद्धव ठाकरे यांची व्यूहरचना यशस्वी झाली होती आणि आता पुन्हा पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी नवी व्यूहरचना तयार केल्याचे सांगितले जात आहे.
शिवसेनेतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तेजस ठाकरे यांना सक्रिय राजकारणात आणण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही महिन्यांपूर्वी तेजसच्या वाढदिवशी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती दिल्या होत्या. त्याचवेळेस तेजस राजकारणात उतरणार असल्याचे अप्रत्यक्षरित्या सूचित करण्यात आले होते. दसरा मेळाव्यात वारसदार घोषित करण्याची परंपरा असल्याने उद्धव ठाकरे आज तेजस ठाकरे यांच्या राजकीय पदार्पणाची घोषणा करतील अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
खरे तर तेजस जरी राजकारणात पुढे दिसत नसला तरी त्याच्यात नेता होण्याचे पुरेपूर गुण आहेत. आणि हे मी म्हणतोय असे नाही तर स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच हे म्हटले होते. 2010 च्या दसरा मेळाव्यात तेजसबाबत बोलताना बाळासाहेब म्हणाले होते, तेजस अगदी माझ्यासारखा आहे. माझ्या आणि त्याच्या आवडी समान आहेत. तो कडक डोक्याचा आहे. माझ्यासारखाच आहे. आणि बाळासाहेबांचे हे उद्गार अक्षरशः खरे आहेत. जे तेजसला जवळून ओळखतात त्यांना याची चांगलीच जाणीव आहे.
तेजसला पर्यावरण आणि प्राण्यांची खूप आवड आहे. त्यामुळे तो त्याच्यातच मग्न असतो. मात्र, मागील विधानसभा निवडणुकीवेळी तेजस आदित्य ठाकरे यांचा निवडणूक अर्ज भरताना उपस्थित होता. एवढेच नव्हे तर सभेत त्याला मंचावरही आमंत्रित करण्यात आले होते. त्यापूर्वी संगमनेर येथील सभेतही तेजसला मंचावर आमंत्रित करण्यात आले होते. त्यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते, तेजस फक्त सभा पाहायला आला आहे. मात्र, तो जंगलात रमणारा असला तरी राजकारणात काहीही होऊ शकते असेही त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या वक्तव्याचा दाखला देऊन म्हटले होते.
ही सर्व पार्श्वभूमी तेजसला राजकारणात आणण्यासाठी उपयुक्त ठरणारी आहे. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका निवडणुकांची जबाबदारी आदित्यसोबत तेजसकडे सोपवण्याचा विचार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आहे. आदित्य ठाकरे हे मंत्री असल्याने निवडणुकीच्या तयारीसाठी संपूर्ण वेळ देणे त्यांना शक्य होणार नाही. वरुण सरदेसाई जरी युवा सेनेची जबाबदारी पाहात असले तरी तेजस ही जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पाडेल. पुढील वर्षी होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत लढणार आहे. त्यामुळे तिकीट वाटपाचा मोठा घोळ होणार आहे. त्यातच भाजप मनसेसोबत ही निवडणूक लढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा स्थितीत जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा प्रयत्न शिवेसेनेला करायचा आहे आणि त्यासाठीच तेजसला सक्रिय राजकारणात आणले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
थोड्याच वेळात षण्मुखानंद येथे शिवसेनेचा दसरा मेळावा सुरु होत असून तेजसचा राजकारणात प्रवेश होतो की नाही ते कळेलच.
राजकारणात प्रवेश करण्यास सज्ज असलेल्या तेजसला शुभेच्छा!