(Source: ECI/ABP News/ABP Majha)
BLOG | महाराष्ट्रात नवीन ठाकरे!
ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केल्याशिवाय महाराष्ट्राच्या राजकारणावर चर्चा अपूर्ण आहे. गेल्या 5 दशकांपासून या कुटुंबाने राज्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग घेऊन त्याला आकार दिला आहे. पिढ्यानपिढ्या हे कुटुंब राजकारणाशी जोडले गेले आहे. आता यात आणखी एका नावाची चर्चा होत आहे.
ठाकरे आणि पवार या दोन घरांभोवती महाराष्ट्राचे राजकारण गेल्या पाच दशकांपासून केंद्रित आहे. पिढ्यानपिढ्या, राज्याच्या राजकारणाला या कुटुंबांकडून नवे चेहरे मिळत आले आहेत. आता यात एका नवीन नावाची चर्चा होत आहे, ती तेजस ठाकरे यांच्या नावाची. तेजस हे शिवसेना प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा धाकटा मुलगा आहे. 7 ऑगस्ट रोजी सामना वृत्तपत्रात त्यांच्या फोटोसह जाहिरातीने राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आणि तेजस देखील राजकारणात प्रवेश करणार की नाही याविषयी चर्चा सुरू झाली.
तेजस ठाकरे यांचा फोटो वेस्ट इंडीजचे क्रिकेटपटू सर विवियन रिचर्ड्स सोबत छापण्यात आला होता आणि त्यावर ठाकरे कुटुंबाचे विवियन रिचर्ड्स लिहिले होते. निमित्त होते तेजस यांच्या 26 व्या वाढदिवसाचे. शिवसेनेचे सचिव आणि उद्धव ठाकरे यांचा उजवा हात मानले जाणारे मिलिंद नार्वेकर यांनी ही जाहिरात छापली होती. तेजसची तुलना रिचर्ड्सशी का केली गेली असे विचारले असता नार्वेकर यांनी एबीपी माझाला सांगितले, की "आदित्य ठाकरे हे सुनील गावसकरांसारखे धैर्यवान आहेत पण तेजस विवियन रिचर्ड्ससारखाच आक्रमक आणि निर्णायक आहे."
जाहिरात देण्यामागे त्यांचा हेतू फक्त तेजसला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याचा होता आणि त्यातून कोणताही राजकीय अर्थ काढला जाऊ नये, असेही नार्वेकर यांनी स्पष्ट केले. पण राजकीय अर्थ काढला जाणार. कारण, नार्वेकर यांच्याकडून जाहिरात देणे आणि ती पक्षाचे मुखपत्र असलेल्या सामनामध्ये छापून येणे याला महत्व आहे. लवकरच एक नवीन ठाकरे महाराष्ट्राच्या राजकारणात प्रवेश करू शकतात, असाच याचा अर्थ काढला जात आहे.
तेजस ठाकरे हे रश्मी आणि उद्धव ठाकरे यांचे दुसरे पुत्र आहेत आणि आतापर्यंत ते राजकारणापासून दूर राहिले आहेत. त्याची आवड वन्यजीव छायाचित्रण आणि संशोधनात आहे. खेकड्यांच्या अकरा प्रजाती आणि सापाची एक प्रजाती शोधण्याचे श्रेय तेजसला जाते. तेजसने सामान्यपणे सार्वजनिक कार्यक्रमांपासून स्वतःला दूर ठेवले आहे. भाऊ आदित्य ठाकरे यांच्या 2019 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी दाखल करण्यासाठी आदित्य यांच्यासोबत पहिल्यांदा तेजस दिसले होते. तेजस सहसा माध्यमांच्या कॅमेऱ्यांपासून स्वतःला दूर ठेवतात.
ठाकरे कुटुंब सार्वजनिक जीवनात केशव ठाकरे यांच्या काळापासून आहे, ज्यांना प्रबोधनकार म्हणून ओळखले जाते. प्रबोधनकार ठाकरे हे समाजसेवक होते. त्यांचा मुलगा बाळसाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली. बाळसाहेब ठाकरे यांचे पुत्र उद्धव यांनी त्यांच्यानंतर पक्षाची सूत्रे हाती घेतली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. उद्धव यांचा मोठा मुलगा आदित्य कॅबिनेट मंत्री आहे आणि आता चर्चा सुरू आहे आदित्य यांचा धाकटा भाऊ तेजसबद्दल. दुसरीकडे, ठाकरे घराण्याची दुसरी शाखाही राज्याच्या राजकारणात आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे, ज्याचे प्रमुख राज ठाकरे आहेत.