Mumbai BMC Budget 2025: पालिकेची तिजोरी भरण्यासाठी मुंबईकरांच्या खिशाला कात्री लागणार, बजेटमध्ये कचरा संकलन शुल्काच्या घोषणेची शक्यता
Mumbai News: मुंबई महानगरपालिकेकडून मोठ्या घोषणेची शक्यता. मुंबई महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प आज मांडला जाणार आहे. हा अर्थसंकल्प 65 हजार कोटी रुपयांचा असण्याची शक्यता

मुंबई: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प मंगळवारी सादर केला जाणार आहे. महापालिका आयुक्त भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा पाच ते दहा टक्क्यांनी बजेटमध्ये (Budget 2025) वाढ होणार असल्याची माहिती आहे. देशातील सर्वात श्रीमंत महापालिका असलेल्या मुंबई महापालिकेच्या पालिका निवडणूक वर्षातील बजेटकडे (Mumbai Budget 2025) मुंबईकराचं लक्ष लागून राहिलं आहे. या बजेटमध्ये पालिकेकडून कचरा शुल्काची घोषणा होण्याची शक्यता आहे. तसे घडल्यास मुंबईकरांच्या डोक्यावर अतिरिक्त कराचा बोजा वाढेल.
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचे स्रोत आटले आहेत. काही वर्षांपूर्वी जकात कर बंद झाल्यानंतर पालिका महसूलाचे नवे पर्याय शोधत आहे. त्यामुळे आता स्वच्छ भारत अभियानातंर्गत येणाऱ्या स्वच्छता सर्वेक्षणाचा भाग म्हणून मुंबईकरांना कचरा शुल्क लावले जाण्याची शक्यता आहे. मुंबईकरांकडून कचरा संकलन शुल्क आकारल्यास महापालिकेला 500 ते 600 कोटींचे अधिकचे उत्पन्न मिळू शकेल. मात्र, हे कचरा शुल्क नेमके किती असेल, याबाबतची नेमकी माहिती मिळू शकलेली नाही. त्यासाठी अर्थसंकल्प (BMC Budget 2025) जाहीर होण्याची वाट पाहावी लागणार आहे. मात्र, मुंबईत अनेक प्राथमिक सुविधांची वानवा असताना नागरिकांकडून कचरा शुल्क आकारले गेल्यास त्याचे काय पडसाद उमटणार, हे बघावे लागेल. मुंबईकरांकडून कचरा शुल्क आकारले गेल्यास त्यानुसार नागरिकांना सुविधा मिळणार का आणि शहरातील कचऱ्याची समस्या पूर्णपणे सोडवण्याच्यादृष्टीने पालिका कोणत्या उपाययोजनांची घोषणा करणार, हेदेखील बघावे लागेल.
यंदाच्या वर्षात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे. या पार्श्वभूमीवर आयुक्त भूषण गगराणी हे बजेटमध्ये कोणत्या घोषणा करणार, याकडे राजकीय वर्तुळ आणि सामान्य नागरिकांच्या नजरा लागल्या आहेत. यंदाच्या अर्थसंकल्पात कोस्टल रोड मार्गाचा दुसरा टप्पा, गोरेगाव-मुलुंड जोड रस्ता, समुद्राच्या पाण्यापासून गोडे पाणी तयार करणे अशा प्रकल्पांसाठी मोठी आर्थिक तरतूद केली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
मालमत्ता कराबाबत मोठ्या घोषणेची शक्यता
गेल्या काही वर्षांमध्ये मुंबई महानगरपालिकेकडून मालमत्ता करात वाढ होणार, अशी चर्चा सातत्याने सुरु आहे. मात्र, मालमत्ता कर वाढवल्यास राजकीय नुकसान सहन करावे लागू शकते, या भीतीने पालिकेतील सत्ताधारी आतापर्यंत हा निर्णय टाळत आले होते. मालमत्ता करात दर पाच वर्षांनी वाढ होणे अपेक्षित आहे. परंतु, मुंबई महानगरपालिकेने 2015 नंतर मालमत्ता करात कोणतीही वाढ केलेली नाही. यंदा निवडणुकीचे वर्ष असल्याने मालमत्ता करात वाढ होण्याची शक्यता फारच कमी आहे. मात्र, पालिकेकडून झोपडपट्ट्यांमधील व्यावसायिक गाळ्याप्रमाणेच अन्य काही बांधकामे मालमत्ता कराच्या कक्षेत आणली जाऊ शकतात. त्यामुळे पालिकेचा महसूल वाढू शकतो.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
