Mumbai Municipal Corporation Budget 2025-26: मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या सादर होणार; रस्ते, आरोग्य, बेस्ट, पर्यावरणावर विशेष लक्ष दिले जाण्याची शक्यता
Mumbai Municipal Corporation Budget 2025-26: मुंबईकरांना नेमकं या बजेट मधून काय मिळणार?, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

Mumbai Municipal Corporation Budget 2025-26: देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळख असलेल्या मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या (4 फेब्रुवारी) सादर होणार आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुका याच वर्षी होणार असल्याने या इलेक्शन बजेट कडे सगळ्यांचेच लक्ष असणार आहे. मुंबई महापालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी हे पहिल्यांदाच अर्थसंकल्प मांडतील. मुंबईत विविध योजनांसाठी आणि पायाभूत सुविधांसाठी भरीव तरतूद या अर्थसंकल्पात असेल असं सांगितलं जातय. शिवाय मागील वर्षात तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी यावर्षी बजेटमध्ये वाढ होणार असल्याची माहिती आहे. मुंबईकरांना नेमकं या बजेट मधून काय मिळणार? निवडणुकीच्या तोंडावर सादर होत असलेल्या बजेटला महत्त्व का आहे?, जाणून घ्या...
मुंबई महापालिकेचा 2024-25 चा अर्थसंकल्प 59,954 कोटींचा होता. त्यामुळे 2025-26 चा मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीचा अर्थसंकल्प हा 65 हजार कोटींच्या वरचा असेल असं सांगितलं जातंय. ज्यामध्ये मुंबईतील पायाभूत सुविधा, योजना, विविध प्रकल्प मुंबईकरांच्या समस्यांवरील उपाय या सगळ्यांचा विचार करून अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली जाणार आहे. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प सादर होत असताना राज्य सरकारचासुद्धा यामध्ये विशेष लक्ष असणार आहे. शिवाय महायुती सरकारची छाप सुद्धा मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्प मांडताना दिसणार आहे
मुंबई महापालिकेच्या यंदाच्या वर्षी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडे विशेष लक्ष. कोणत्या गोष्टींचा विचार अर्थसंकल्प सादर करताना केला जाईल ?
- महापालिका निवडणूकीचं वर्ष असल्यानं यंदाचं बजेट हे इलेक्शन बजेट असणार का?
- यंदाच्या महापालिका बजेटवर महायुती सरकारची छाप असणार अशी चर्चा आहे
- कोणतीही नवी करवाढ नाही; नव्या योजनांसाठी भरीव तरतुद असण्याची शक्यता
- रस्ते; आरोग्य; बेस्ट; इन्फ्रा प्रोजेक्ट, पर्यावरण या बाबींवर बजेटमध्ये विशेष लक्ष दिलं जाण्याची शक्यता
- मुंबई महापालिका बजेटचा आकडा मागील वर्षे तुलनेत पाच ते दहा टक्क्यांनी वाढणार आहे, 65 हजार कोटी पार होण्याची शक्यता
- 2022 पासून बिएमसीच्या एफडीला गळती लागलीय. ठेवींची रक्कम 91 हजार कोटींवरुन 80 हजार कोटींवर आलीय... मालमत्ता करात सवलत दिल्यानं दरवर्षी महापालिकेचं 4500 कोटींचं नुकसान होतंय. त्यामुळे ही नुकसान भरपाई काढण्याचा आव्हान सुद्धा मुंबई महापालिकेसमोर असेल...
कोणत्या प्रकल्पांसाठी भरीव तरतुदीची अपेक्षा
१) मुंबईतील रस्त्यांचे सिमेंट काँक्रिटीकरण
२)कोस्टल रोडचा दहिसर पर्यंतचा विस्तार
३) गोरेगांव - मुलुंड लिंक रोड
४) सांडपाणी प्रक्रीया केंद्र
५) नवीन आरोग्य सुविधा
६) शहर; उपनगरांतील मैदाने;उद्याने आणि इतर सुशोभिकरण
७) बेस्ट उपक्रमाकरता तरतुद
८) पर्यावरण; प्रदुषण नियंत्रणाकरता योजना
९) देवनार डंपींग ग्राऊंड साफ करुन ती जागा धारावीकरांना पुर्नविकास प्रकल्पाला दिली जाऊ शकते... त्यामुळे देवनारच्या स्वच्छतेसाठीही भरीव तरतुदीची शक्यता
१०) सुशोभीकरण प्रकल्प; स्वच्छ मुंबई योजना; दिव्यांग योजना सुरु राहणार का याकडे लक्ष
अर्थसंकल्पावर छाप राज्य सरकारची असणार-
यंदाची मुंबई महापालिका निवडणूक महायुतीतील पक्ष असू द्यात किंवा महाविकास आघाडीतील पक्ष या सगळ्यांसाठीच महत्त्वाची असणार आहे. त्यामुळे प्रशासक जरी हा अर्थसंकल्प मांडणार असले तरी या त्या अर्थसंकल्पावर छाप राज्य सरकारची असणार आहे. त्यामुळे मुंबई महापालिका निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विविध समस्या आणि त्रासातून जाणाऱ्या मुंबईकरांना खुश करण्याचं काम या अर्थसंकल्पात केलं जाईल अशी चर्चा आहे. आता प्रत्यक्षात मुंबईकरांना या अर्थसंकल्पातून काय मिळतं? या अर्थसंकल्प सादर झाल्यावरच कळणार आहे.
बिलं थकली, कंत्राटदार निर्वाणीवर, VIDEO:
संबंधित बातमी:
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज

