(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याची घटना ‘देवाची करणी’; मुख्य आरोपी भावेश भिंडेची उच्च न्यायालयात याचिका
Ghatkopar Hoarding Case: घाटकोपर होर्डिंग कोसळल्याची घटना ‘ॲक्ट ऑफ गॉड’, त्यामुळे माझी अटक बेकायदेशीर ठरवून मला जामीन द्या, मुख्य आरोपी भावेश भिंडेची उच्च न्यायालयात याचिका.
Ghatkopar Hoarding Case: मुंबई : मुंबईतील (Mumbai News) घाटकोपर परिसरात होर्डिंग (Ghatkopar Hoarding Case) कोसळल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला मुख्य आरोपी भावेश भिंडे (Bhavesh Bhinde) यानं मुंबई उच्च न्यायालयात (Mumbai High Court) धाव घेऊन रिट याचिका दाखल केली आहे. त्यात भिंडे यांनी आपली अटक बेकायदेशीर ठरवत जामिनाची मागणी केली आहे. त्याच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.
इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक भिंडे यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, 13 मे रोजी घडलेली घटना, ज्यामध्ये 17 लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 80 जण जखमी झाले, ही नैसर्गिक आपत्ती होती आणि त्यासाठी त्यांना जबाबदार धरू नये. यासोबतच त्यांनी केलेले दावे सिद्ध करण्यासाठी याचिकेत ब्युफोर्ट स्केलचाही उल्लेख करण्यात आला आहे, जो वाऱ्याचा वेग मोजतो.
भिंडे यांच्या याचिकेत पुढे म्हटलं आहे की, आयएमडीनं 12 मे रोजी दुपारी 1.45 वाजता अखिल भारतीय हवामान सारांश आणि अंदाज बुलेटिन जारी केलं होतं. मुंबईत धुळीचे वादळ आणि जोरदार वारे येण्याची शक्यता त्या बुलेटिनमध्ये कुठेही नमूद करण्यात आलेली नाही. परंतु, 13 मे रोजी दुपारी 4:15 च्या सुमारास, मुंबईला धुळीचे वादळ आणि 60 किमी प्रतितास ते 96 किमी प्रति तास या वेगानं वाऱ्याचा तडाखा बसला, जे अत्यंत असामान्य होतं आणि यापूर्वी कधीही अनुभवलं नव्हतं. आयएमडीनं पुष्टी केली होती की, बीएमसीच्या स्वयंचलित हवामान केंद्रानं नोंदवलेल्या वाऱ्याचा वेग ताशी 96 किमी होर्डिंगवर परिणाम करत होता.
वाऱ्याच्या वेगामुळेच होर्डिंग कोसळलं, पण एफआयआरमध्ये आरोप करण्यात आला आहे की, बांधकामात निष्काळजीपणा केल्यामुळे होर्डिंग कोसळलेलं नाही, असंही याचिकेत नमूद करण्यात आलं आहे. ब्युफोर्ट विंडफोर्स स्केलच्या साहाय्यानं समुद्र किंवा जमिनीवरून वाहणाऱ्या वाऱ्याचा वेग मोजतो, त्यानुसार वाऱ्याच्या वेगाचे 12 प्रकारे वर्णन केलं जातं. जसं की, ताशी 89 किमी ते 102 किमी प्रति तास या वाऱ्याचा वेग वादळ मानला जातो. त्यामुळे कोणत्याही संरचनेचं नुकसान होऊ शकतं, एवढंच नाही तर अशा वाऱ्यामुळे झाडंही उन्मळून पडू शकतात, असं भिंडे यानं दाखल केलेल्या याचिकेत सांगण्यात आलं आहे.
याचिकेत पुढे म्हटलं आहे की, IMD नं नोंदवलेला वाऱ्याचा वेग असामान्य होता. आणि हे होर्डिंग पडण्यास कारणीभूत 'देवाची कृती' होती आणि हा एक दुर्दैवी अपघात होता. ज्यासाठी याचिकाकर्ता (भिंडे) किंवा इगो मीडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला दोषी धरता येणार नाही.
भिंडे यांनी पुढे दावा केला की, 13 मे रोजी वाऱ्याचा वेग जास्त असल्याने शहरात अशाच प्रकारच्या अनेक घटना घडल्या. जोरदार वाऱ्यामुळे काही इमारतींचे नुकसान झाले, अनेक झाडं उन्मळून पडल्यानं अनेक लोक जखमी झाले तर 2 जणांचा मृत्यू झाला. एवढंच नाही तर त्याच दिवशी मुंबईतील वडाळा परिसरात असलेल्या एका इमारतीच्या पार्किंगचे लोखंडी स्ट्रक्चर कोसळलं होतं, त्यात तीन जण गंभीर जखमी झाले होते. या प्रकरणी वडाळा पोलीस स्टेशननं 13 मे 2024 रोजी एफआयआर नोंदवला असून त्यात फक्त आयपीसीचे कलम 336, 337, 338, 427 आणि 34 लावण्यात आले आहेत. मात्र, घाटकोपर प्रकरणात आयपीसीचे कलम 304 जोडण्यात आले आहे.