BMC Election : मुंबई महापालिकेसाठी भाजपचं टार्गेट 150, कसा आहे 'मिशन मुंबई' मेगा प्लॅन?
Mission Mumbai : मुबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी भाजपकडून हालचाली सुरू झाल्या असून भाजपच्या 'मिशन मुंबई'चा मेगा प्लॅन ठरला आहे.
मुंबई: कोणत्याही परिस्थितीत यंदा मुंबई महापालिकेवर (BMC Election) भाजपचा झेंडा रोवायचाच, महापालिकेची सत्ता हाती घ्यायचीच असां चंग बांधून भाजप कामाला लागल्याचं दिसून येतंय. भाजपच्या 'मिशन मुंबई'ला सुरुवात झाली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी त्या संदर्भात मुंबई दौरा केला आहे. भाजपने 'मिशन मुंबई' अंतर्गत महापालिकेत 150 जागा जिंकण्याचं लक्ष्य ठेवलं असून त्यासाठी 82+30+40 चा फॉर्म्युला ठरवला असल्याची माहिती आहे.
कसा आहे भाजपचा 'मिशन मुंबई' मेगा प्लान?
- 150 जागांच्या लक्ष्याकरता 82+30+40 चा फॉर्म्युला.
- सर्वप्रथम 2017 च्या निवडणुकीत जिंकलेल्या 82 जागा कशा राखल्या जातील याकडे लक्ष.
- 2017मध्ये दुसऱ्या क्रमांकावरची मते मिळालेल्या 30 जागा निवडून आणण्याकरता प्रयत्न.
- उर्वरित 40 जागांमध्ये स्वबळावर निवडून येणाऱ्यांना प्राधान्य.
- स्वबळावर निवडून येणाऱ्या कॉंग्रेस, राष्ट्रवादी, इतर लहान पक्षातील उमेदवारांना हेरुन त्यांना भाजपमधून उमेदवारी देणं.
- शिंदे गटाला सोबत घेऊन शिवसेना विरुद्ध शिवसेना अशा लढती तयार करणं.
- उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असलेल्या वॉर्डातील असंतुष्टांना हेरुन तिथे मतविभागणी करणं.
- मुस्लिम, हिंदी भाषिक पट्ट्यात स्ववबळावर निवडून येणाऱ्या शिवसेना आणि इतर पक्षातील उमेदवारांना आपलंसं करणं.
- दहिहंडी, गणेशोत्सस, नवरात्र या सणांच्या माध्यमातून मतांची विशेषत: मराठी मतांची जोडणी करणं.
भाजपनं मुंबई जिंकण्यासाठी तयार केलेला हा रोडमॅप अखेरपर्यंत अनेक वळणंही घेऊ शकेल. यात शिंदे गटाला सोबत घेतांना भाजप आणि शिंदे गटाचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय असावा याबाबत अद्याप निश्चिती झालेली नाही. तसंच गेल्या काही काळातली राज ठाकरेंसोबतची जवळीक पाहता निवडणुकीतही मनसेला सोबत घेऊन कायम ठेवायची की नाही याबाबतही भाजपमध्ये अजून निश्चितता नाही.
भाजपचा सध्याचा मेगाप्लान हा 227 जागांकरता तयार आहे. 2017 च्या वॉर्ड रचनेनुसार निवडणुका घेण्याला राज्य सरकारनं मंजुरी दिली असली तरी कोर्टात वेगळा निर्णय झाला तर भाजपला वाढीव जागांकरता पुन्हा तयारी करावी लागेल.
उद्धव ठाकरेंना जमीन दाखवा
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचा मुंबई दौरा पूर्ण झाला असून त्यांनी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाल की, राजकारणात सगळं काही सहन करा, मात्र धोका सहन करू नका. जे धोका देतात त्यांना योग्य ती शिक्षा झालीच पाहिजे. मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे.
ही शेवटची निवडणूक समजून लढा
आगामी मुंबई महापालिका निवडणूक ही आपल्यासाठी शेवटची निवडणूक आहे असे समजून लढा असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत्या संदर्भात ते कार्यकर्त्यांना उद्देशून बोलत होते.