(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ZP Nagpur : जिल्हा परिषद सभापती निवडीवरुन राष्ट्रवादीतही रस्सीखेच; हिंगणा आणि काटोल क्षेत्रातून दावे
कॉंग्रेसने 6 विधानसभेत पदाधिकारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सदस्या अध्यक्ष व उपाध्यक्ष हे सावनेर व हिंगणा विधानसभा क्षेत्रातील आहे. त्यामुळे हिंगणा विधानसभेत दुसरे पद मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.
Nagpur News : पहिल्या टर्ममध्ये एक सभापतीपद देऊन कॉंग्रेसने (Congress) राष्ट्रवादीची (NCP) बोळवण केली होती. त्यामुळे यंदा दोन सभापतीपदासाठी राष्ट्रवादीचे जोरकस प्रयत्न सुरु आहे. परंतु कॉंग्रेसकडे इच्छुकांची गर्दी लक्षात घेता आणि अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत झालेली बंडखोरी, वाढलेली नाराजी लक्षात घेता, कॉंग्रेस एकच सभापतीपद राष्ट्रवादीला सोडेल असे बोलले जात आहे. परंतु, राष्ट्रवादीतील हिंगणा आणि काटोल विधानसभा मतदारसंघातील सदस्य सभापतीसाठी इच्छुक असून त्यासाठी रस्सीखेचही सुरु आहे.
जिल्हा परिषदेतील (Zilla Parishad Nagpur) चार सभापतीपदासाठी 1 नोव्हेंबर रोजी निवडणूक होणार आहे. दोन सभापतीपदासाठी राष्ट्रवादीने कॉंग्रेसकडे मागणी केली आहे. गेल्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात राष्ट्रवादीचे सदस्य आपली छाप सोडू शकले नाही. गट नेत्यांचाही पाहिजे तसा प्रभाव दिसून आला नाही. पहिल्या टर्ममध्ये राष्ट्रवादीने उपाध्यक्षपदासाठी जोर लावला होता. पण महिला व बालकल्याण समिती सभापतीपदावरच त्यांना समाधान मानावे लागले. हे सभापतीपददेखील कॉंग्रेसच्या गोटातून मिळाले असल्यामुळे राष्ट्रवादीच्या सदस्यांची नाराजी व्यक्त केली होती. राष्ट्रवादीला कसाबसा एक हक्काचा कक्ष मिळूनही त्यांच्या सदस्यांनी अडीच वर्षात पाय ठेवला नाही. यंदा मात्र राष्ट्रवादीने उपाध्यक्षपद कॉंग्रेसला सोडले पण दोन सभापतीपदासाठी मागणी केली आहे. कॉंग्रेसने यंदा सहाही विधानसभेत पदाधिकारी देण्याचा निर्णय घेतला आहे. सदस्या अध्यक्ष व उपाध्यक्ष हे सावनेर व हिंगणा विधानसभा क्षेत्रातील आहे. त्यामुळे हिंगणा विधानसभेत दुसरे पद मिळणार नसल्याचे बोलले जात आहे. गेल्यावेळी हिंगणा मतदार संघाला एक पद मिळाले असल्याने यावेळी काटोल मतदारसंघाला पद मिळावे, यासाठी जोर लावला जात आहे.
इच्छुकांची गर्दी; अंतिम निर्णय कॉंग्रेस घेणार
- राष्ट्रवादीकडून दिनेश बंग, वृंदा नागपुरे, प्रवीण जोध, दीक्षा मूलताईकर यांच्या महिला व बाल कल्याण सभापती उज्ज्वला बोढारेदेखील इच्छुक आहेत.
- उमेदवार राष्ट्रवादीचा असला तरी जो कॉंग्रेसला पटेल त्यालाच संधी दिली जाईल असे जिल्हा परिषदेच्या वर्तुळात जवळपास निश्चित आहे.
निवडणूक कार्यक्रम जाहीर
एक नोव्हेंबरला उपविभागीय अधिकारी (नागपूर ग्रामीण) यांच्या अध्यक्षतेत निवडणूक प्रक्रिया पूर्ण होणार आहे. त्यासाठी सकाळी 11 ते दुपारी 1 यावेळेत नामनिर्देशनपत्र वाटप व स्वीकारण्यात येणार आहे. दुपारी 3 वाजता विशेष सभेला सुरुवात होईल. दुपारी 3.05 ते 3.15 यावेळेत नामनिर्देशनपत्राची छाननी होईल. 3.15 ते 3.30 यावेळेत अर्ज मागे घेण्याची मुदत असेल. त्यानंतर गरजेनुसार दुपारी 3.45 वाजतापासून मतदानास सुरुवात होईल.
महत्त्वाची बातमी