Shiv Jayanti 2022 : शिवजयंतीच्या तारखेचा वाद कसा मिटला? सर्व प्रकरण समजून घ्या...
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने? हे पुन्हा समजून घ्यावे लागेल.
Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2022 : गेली अनेक दशके महाराष्ट्रात शिवजयंती नक्की कोणत्या तारखेला साजरी करायची यावर वाद-प्रतिवाद आहेत. तिथीनुसार आज मनसे नेते राज ठाकरे यांनी शिवजयंती साजरी केली. ते पाहून आजवर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी केले नाही ते उद्धव ठाकरेंनी केले. मुख्यमंत्र्यांनीही आज शिवजयंती साजरी केली. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म नक्की कोणत्या तारखेला झाला, त्या दिवशी कोणती तिथी होती, जयंती तारखेने साजरी करायची की तिथीने? हे पुन्हा समजून घ्यावे लागेल.
शिवाजी महाराजांची जयंती महाराष्ट्र सरकार फाल्गुन वद्य तृतिया, शके 1551 शुक्ल संवत्सर या तिथीनुसार की 19 फेब्रुवारी हा जन्म दिवशी साजरी करायची हा वाद नेमका समजून घेऊयात...
पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्माची तारीख वैशाख शुद्ध द्वितिया शके 1549 मानली जात असे. इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे हा दिवस होता 6 एप्रिल 1627. लोकमान्य टिळकांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबाबत विशेष प्रयत्न करुन काही मते मांडली होती. 14 एप्रिल 1900 च्या दिवशी केसरीमध्ये छापलेल्या लेखात त्यांनी याचा सविस्तर ऊहापोह केला होता. बखरकारांनी वेगवेगळ्या नोंदी केल्यामुळे शिवाजी महाराजांची जन्मतारीख नक्की कोणती असावी यावर एकमत नव्हते. पण हा वाद मिटला होता.
हे तीन मुद्दे महत्वाचे...
1) कवी भूषण यांनी 'शिवभूषण' या काव्यात शिवाजी महाराजांच्या जन्मतारीख दिलेली नाही.
2) सभासद बखर ही शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सुमारे पंधरा वर्षांनी लिहिली गेली. त्यामध्येही तारखेचा उल्लेख नाही.
3) मल्हार रामराव चिटणीस यांनी लिहिलेल्या बखरीमध्ये वैशाख शुद्ध द्वितीया शके 1549 गुरुवार असा उल्लेख आहे. त्यानुसार इंग्रजी तारीख पडताळली तर ती 6 एप्रिल 1627 येते.
जोधपूरमध्ये सापडलेली शिवाजी महाराजांची जन्मपत्रिका शिवाजी महाराजांचा जन्म 1630 साली झाला हे सिद्ध करणारा एक महत्त्वाचा पुरावा आहे. सुरुवातीच्या काळात शिवाजी महाराजांचा जन्म शके 1549 मधल्या वैशाख महिन्यात झाला असावा असे मानले जात होते. 1916 साली सापडलेल्या एका दस्तऐवजानंतर मात्र ही परिस्थिती बदलली. हा दस्तऐवज म्हणजे प्रसिद्ध जेधे शकावली. या शकावलीमध्ये दिलेल्या नोंदीनुसार लोकमान्य टिळकांनी 19 फेब्रुवारी 1630 असल्याचे घोषित केले.
शिवजयंती नक्की कधी साजरी करायची आणि महाराजांची जन्मतारीख कोणती होती हा प्रश्न सोडवण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक समिती 1966 साली स्थापन केली. परंतु समितीत एकमत झाले नाही. समितीने जन्मतारखेबाबतचा निर्णय शासनाकडेच सोपवला. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉक्टर आप्पासाहेब पवार यांच्या अध्यक्षतेखाली सहा ते सात जणांची समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने वेगवेगळ्या ऐतिहासिक दस्तांचा अभ्यास करून छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख ही 19 फेब्रुवारी 1630 आहे हे अंतिम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्म वर्ष 1627 नसून 1630 आहे हेही या समितीने सांगितलं. परंतु समितीने आपला अहवाल देत असताना लोक भावना हा भाग लक्षात घ्यावा अशा पद्धतीची भूमिका मांडली.
2000 साली विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना शिवजंयतीच्या तारखेचा विषय पुन्हा आला. विलासरावांनी शिवजयंती 19 फेब्रुवारी साजरी केली जाईल असे आदेश जारी केले. 2000 पासून राज्याचा प्रत्येक मुख्यमंत्री हा 19 फेब्रुवारीलाच शिवजयंती साजरी करतो. आज त्याला मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेमुळे छेद गेला आहे.