काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांचा काँग्रेसच्या प्रसारमाध्यम, संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा
काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिली आहे. तर दुसरीकडे कराडमध्ये काँग्रेसला खिंडार पडणार आहे. पृथ्वीराज चव्हाणांने अनेक निकटवर्तीय, स्थानिक पदाधिकारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
औरंगाबाद : काँग्रेस नेते राजेंद्र दर्डा यांनी काँग्रेसच्या प्रसारमाध्यम आणि संपर्क कमिटीच्या चेअरमन पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे काँग्रेसला आणखी एक झटका बसला आहे. राजेंद्र दर्डा सलग 15 वर्ष आमदार राहिले आहेत, तसेच त्यांनी वेगवेगळी मंत्रिपदही भूषवली आहेत.
राजेंद्र दर्डा 'लोकमत'सारख्या मोठ्या दैनिकाचे मालक देखील आहेत. राजेंद्र दर्डा यांनी प्रसारमाध्यम आणि संपर्क या कमिटीच्या चेअरमनपदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेससमोरील समस्या आणखी वाढली आहे. वैयक्तिक अडचण असल्यामुळे आपण या कमिटीतून बाहेर पडत असल्याचं राजेंद्र दर्डा यांनी सांगितलं आहे. आपल्या पदाचा राजीनामा त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
कराडमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना धक्का
दुसरीकडे कराडमध्ये काँग्रेसला खिंडार पडणार आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना धक्का बसला आहे. पृथ्वीराज चव्हाण यांचे निकटवर्तीय काँग्रेसचे विधान परिषदेचे विद्यमान आमदार आनंदराव पाटील यांचे पुत्र प्रताप पाटील, पुतणे आणि कराड कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
तसेच काँग्रेसचे माजी मंत्री विलासराव पाटील-उंडाळकर यांचे कट्टर समर्थक, उंडाळेच्या उपसरपंच अनुसया शेवाळे, युवक काँग्रेसचे राज्य सेक्रेटरी नितीन पाटील, राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद सदस्य सविनय कांबळे यांसह अनेक कार्यकर्ते सोमवारी भाजपात जाहीर प्रवेश करणार आहेत.