(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एक बॉयफ्रेंड दोन गर्लफ्रेंड; दोघींमध्ये पैठणच्या भर बाजारातच फ्री स्टाईल, तरुण मात्र पसार
Aurangabad Paithan News : पैठण बसस्थानकावर प्रेयसीला तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरताना दिसल्याची माहिती मिळताच दुसरी गर्लफ्रेंड पैठणच्या बसस्थानकात पोहोचली. अन् मग सुरु झाला राडा.
Aurangabad Paithan News : एका मुलीच्या प्रेमात किंवा एकतर्फी प्रेमातून दोन मुलांमध्ये वादाच्या घटना आपण ऐकल्या असतील मात्र एका प्रियकरासाठी दोन प्रेयसी रस्त्यावर भांडताना पाहिल्या आहेत का? असाच एक प्रकार पैठण बसस्थानकावर पहायला मिळाला. बसस्थानकावर दोन अल्पवयीन तरुणींमध्ये प्रियकरासाठी जोरदार भांडण झाले. एका प्रेयसीला तिचा प्रियकर दुसऱ्या मुलीसोबत फिरताना दिसल्याची माहिती मिळताच दुसरी गर्लफ्रेंड पैठणच्या बसस्थानकात पोहोचली. अन् मग सुरु झाला राडा.
दोन्ही महाविद्यालयीन मुलींची हाणामारी सुमारे अर्धा तास चालली
बसस्थानकावरच दोघीजणी एका बॉयफ्रेंडसाठी भिडल्या. दोघांमधील वाद हाणामारीपर्यंत पोहोचला. यामुळं बसस्थानकावर गर्दी जमा झाली. हा गोंधळ एकीकडे सुरु असताना दुसरीकडे प्रकरण अधिकच बिघडत असल्याचे पाहून तरुण तिथून पसार झाला. दोन्ही महाविद्यालयीन मुलींची हाणामारी सुमारे अर्धा तास चालली. दरम्यान हे भांडणं पाहणाऱ्या प्रवाशांना मात्र हाणामारीचे कारण काही समजत नव्हते. या हाणामारीच्या घटनेची चर्चा मात्र बराच काळ परिसरात रंगली होती.
खरं कारण समोर आल्यावर पोलिसही चक्रावले
प्रकरणाचे गांभीर्य पाहून बसस्थानकावर तैनात असलेले पोलिस कर्मचारी मुख्तार खान यांनी पोलिस निरीक्षक किशोर पवार यांना माहिती दिली. त्यानंतर महिला पोलिसांसह पैठण पोलिस बसस्थानकावर पोहोचले. गोंधळ घालणाऱ्या 'त्या' दोन्ही मुलींना ताब्यात घेतले आणि पोलीस ठाण्यात नेले. तिथं पोलिसांनी त्या दोघींची चौकशी केली. पोलिसांना मारहाणीचे कारण समजल्यावर पोलीसही चक्रावून गेले. एक प्रियकर आणि त्याच्या दोन प्रेयसी असून 'तो' माझाच असल्याचा दावा करत होत्या. अन् याच कारणावरून दोन्ही तरुणींमध्ये सार्वजनिक ठिकाणी मारामारी केल्याचे खरे कारण समोर आले.
दोन्ही तरुणी अल्पवयीन
या दोन्ही तरुणी अल्पवयीन असून तिथल्याच एका हायस्कूलमध्ये शिक्षण घेत आहेत. याबाबत पैठण पोलीस ठाण्यात गोंधळ घालणाऱ्या दोन्ही तरुणीवर सार्वजनिक ठिकाणी गोंधळ केल्याप्रकरणी प्रतिबंधात्मक कारवाई केली असून पोलिस निरीक्षक किशोर पवार यांच्या मार्गर्शनाखाली महिला उपनिरीक्षक लहाने पुढील तपास करीत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या