कितीही सभा घेतल्या तरी राज ठाकरे एकापेक्षा जास्त आमदार निवडून आणू शकले नाहीत : गुलाबराव पाटील
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होऊ घातलेल्या सभे बद्दल संपूर्ण राज्यभरात उत्सुकता निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे.
जळगाव : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सभा घेण्याची आवड आहे. त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी एकच आमदार ते आजपर्यंत निवडून आणू शकले आहेत. ते कोणाचे तरी एजंट म्हणून काम करत असल्याची टीका राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली. ते जळगावमध्ये बोलत होते.
मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या औरंगाबाद येथे होऊ घातलेल्या सभे बद्दल संपूर्ण राज्यभरात उत्सुकता निर्माण झाली असल्याचं पाहायला मिळत आहे. याच पार्शवभूमीवर राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांना या सभेविषयी विचारलं असता त्यांनी म्हटल आहे की, "राज ठाकरे यांना सभा घेण्याची आवड आणि छंद आहे. त्यामुळे ते नेहमी सभा घेत असतात. मात्र गुणपत्रिकेवर किती मार्क आहेत हे जोपर्यंत दिसत नाही तोपर्यंत त्या गुणपत्रिकेला महत्त्व असते. त्यांनी कितीही सभा घेतल्या तरी आजपर्यंत एका आमदाराशिवाय जास्त निवडून आणू शकलेले नाहीत."
"जनता, लोकप्रतिनिधींवर पक्षाची ताकद समजली जात असते. सभा घेणे त्यांचा छंद असला तरी ते कोणाचे तरी एजंट म्हणून काम करत आहेत. ते कोणाचे एजंट आहेत हे सर्वांना माहित आहे. दर दोन वर्षाला ते आपली भमिका बदलत आहेत. मात्र त्यांना कुठेच यश मिळत नसल्याने ते असे काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचं सांगत मंत्री गुलाबराव पाटील यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
राज ठाकरेंच्या सभेला अटी-शर्तींसह परवानगी
राज ठाकरे यांच्या औरंगाबादमध्ये 1 मे रोजी होणाऱ्या सभेला पोलिसांची परवानगी मिळाली आहे. मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर मनसेनं सभेची जय्यत तयारी केली आहे. तसंच, पोलिसांनीही सभेसाठी बंदोबस्ताचा प्लॅन तयार केला आहे. राज ठाकरे यांनी प्रक्षोभक भाषण करु नये, अशी अट घातली जाणार असून सभेआधी राज ठाकरेंना तशी नोटीस दिली जाणार आहे.
राज ठाकरेंच्या सभेसाठी 'या' अटी-शर्ती :
- ध्वनी प्रदूषणाचे नियम पाळावे
- लहान मुलं, महिला, वृद्ध यांची सुरक्षितता राहील याची दक्षता घ्यावी
- इतर धर्मियांच्या भावना दुखावणार नाहीत, याची दक्षता घ्यावी.
- सभेदरम्यान कुठल्याही प्राण्याचा वापर करता येणार नाही
- 1 मे रोजी महाराष्ट्र दिन असल्यानं धर्म, प्रांत, वंश ,जात यावरून वक्तव्य करू नये
- व्यक्ती किंवा समुदायाचा अनादर होणार नाही याची दक्षता घ्यावी
- सभेच्या ठिकाणी असभ्य वर्तन करू नये
- वाहन पार्किंगचे नियम पाळावे
- सभेच्या आधी आणि नंतर वाहन रॅली किंवा मिरवणूक काढता येणार नाही
- सभेला येणार्या लोकांनी घोषणा देऊ नयेत, जेणेकरून सामाजिक वातावरण बिघडेल
- सामाजिक सलोखा बिघडेल, असं कुठलंही वर्तन करण्यात येऊ नये