देशपांडे म्हणाले, 'खैरे आऊटडेटेड' तर खैरे म्हणतात, 'तुमच्या नेत्याला विचारा'; शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक 'वॉर'
Chandrakant Khaire vs Sandeep Deshpande : राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेआधी शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर सुरु झालं आहे.
Aurangabad chandrakant Khaire vs Sandeep Deshpande: मशिदीवरील भोंग्यांना विरोध आणि हनुमान चालिसाचा मुद्दा उपस्थित करून आक्रमक हिंदुत्वाची भूमिका घेणाऱ्या राज ठाकरेंनी राज्यातलं राजकीय वातावरण ढवळून काढलं आहे. त्यातच राज ठाकरेंच्या उद्या औरंगाबादेत होणाऱ्या बहुचर्चित सभेकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान या सभेआधी शिवसेना आणि मनसे नेत्यांमध्ये शाब्दिक वॉर सुरु झालं आहे. काल बाबरी मशीद पाडली तेव्हा राज ठाकरे कुठे होते असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी केलं होतं. त्याला मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलंय. बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे फोटोग्राफीमध्ये मग्न होते, अशी खोचक टीका संदीप देशपांडे यांनी केलीये. तसंच त्यांनी संजय राऊत आणि चंद्रकांत खैरे यांच्यावरही टीका केली. दरम्यान खैरे यांनी संदीप देशपांडेंच्या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
संदीप देशपांडे काय म्हणाले...
चंद्रकांत खैरेंवर टीका करताना ते म्हणाले की, खैरे साहेब हे औरंगाबादच आउटडेटेड नेतृत्व आहे. खैरे म्हणजे नोकिया फोन जे कोणी वापरत नाहीत. तशी खैरे साहेबांचे अवस्था आहे. ते आऊटडेटेड झाले आहेत . त्यांचं अपडेटेड वर्जन औरंगाबादकरांना दिसणार नाही, असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं. बाळासाहेबांची ऊर्जा आणि छबी राजसाहेबांमध्ये दिसते. त्यामुळे शिवसेना घाबरलेली आहे. कारण गुण अंगात असावे लागतात. ओढून-ताणून आणून चालत नाही. त्यामुळे घबराट पसरली आहे. महाबळेश्वरच्या अधिवेशनात राज ठाकरे यांनी तुमच्या कार्याध्यक्ष याचा प्रस्ताव ठेवला. त्यामुळे तुम्ही कार्याध्यक्ष झाला. ज्या राजसाहेबांमुळे तुम्ही कार्याध्यक्ष झाला त्यांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी केलं, असं संदीप देशपांडे म्हणाले. हिंदूहृदयसम्राट एकच बाळासाहेब ठाकरे. त्या गोष्टीची चर्चा करायची गरज नाही. यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यांना कुणी हिंदू जननायक म्हणत नाही, चांगला मुख्यमंत्रीही म्हणत नाही. त्यामुळे यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज ठाकरे यांना लोक स्वतःहून उपाधी देतात. अडीच वर्ष झाले मुख्यमंत्री किती वेळा मंत्रालयात गेले. यांचं कौतुक करायचं तर कुठल्या मुद्द्यावर करायचं, असंही देशपांडे म्हणाले. इम्तियाज जलील यांनी इफ्तार पार्टीसाठी दिलेल्या आमंत्रणावर बोलताना देशपांडे म्हणाले की, माझी त्यांना माझी काउंटर ऑफर आहे. जलील यांनी मशीदीवरील अनधिकृत भोंगे काढले तर महाराष्ट्र सैनिक जाऊन त्यांचा शाल श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्याचा सत्कार करतील.
त्यांना माहित नाही पण त्यांच्या साहेबांना माहित आहे मी कसा आहे- खैरे
यावर बोलताना चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे की, मी आऊटडेटेड नाही. त्यांना माहित नाही पण त्यांच्या साहेबांना माहित आहे मी कसा आहे. आम्ही एकत्र होतो त्यावेळेस हे कुठेही नव्हते. शिवसेनाप्रमुख मला नेहमी म्हणायचे, माणूस कधी रिटायर होत नाही, माणूस कामच करत असतो. पाहू मुंबई महानगरपालिकेत तुम्ही काय दिवा लावता. तुम्ही खूप लहान आहात. मी तुमच्यावर टीका केली नाही. तुम्ही तुमचं काम करत राहा. आऊटडेटेड कधीही कोणी होऊ शकत नाही. असं असतं तर मी दोन वेळा आमदार आणि 4 वेळा खासदार झालो असतो का? असं खैरे म्हणाले.