(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ajit Pawar : राष्ट्रवादी अध्यक्ष म्हणून शरद पवार यांना हटवत अजित पवारांकडून स्वतःची अध्यक्ष म्हणून नियुक्ती, सर्व मताने ठराव झाल्याचे पत्र आयोगात
Ajit Pawar Vs Sharad Pawar NCP Crisis: अजित पवारांच्या शपथविधीनंतर दोन दिवसांनी हे पत्र निवडणूक आयोगात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
नवी दिल्ली: अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष आहेत अशा आशयाचा ठराव मंजूर करण्यात आला असून तसं पत्र निवडणूक आयोगामध्ये (Election Commission Of India) दाखल करण्यात आलं आहे. राष्ट्रीय अध्यक्ष पदावरुन शरद पवारांना हटवत अजित पवार यांनी निवड केल्याच्या आशयाचा ठराव पक्षाच्या आमदारांनी एकमताने मंजूर केल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे आता संपूर्ण राष्ट्रवादीवर दावा करण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.
अजित पवार हेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष असल्याचा ठराव मंजूर करण्यात आल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यावर आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. 30 जून रोजीचे राष्ट्रवादीच्या 40 आमदारांच्या सह्यांचे पत्रदेखील अजित पवार यांनी 5 जुलैला म्हणजे आज दाखल केल्याची माहिती आहे. त्यामध्ये पक्षावर दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रवादीच्या चिन्हाची लढाई आता निवडणूक आयोगात
अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी पक्षावर आणि चिन्हावर दावा केला आहे. आपल्याला पक्षातील बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही त्यांनी केला.
Sharad Pawar On ECI : आमची बाजू ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये, शरद पवारांची विनंती
आमची बाजू ऐकल्याशिवाय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी शरद पवारांनी कॅव्हेटद्वारे निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यामुळे आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार? हे पाहणं महत्त्वाचं आहे. या सर्व प्रकरणाकडे पाहता ही शिवसेना फुटीनंतरच्या प्रकरणाची पुनरावृत्ती असल्याचं सातत्याने जाणवतं.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडील अर्जात काय म्हटलंय?
राष्ट्रवादीतील बंडानंतर अजित पवारांच्या गटाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे, त्यांनी थेट निवडणूक आयोगाकडे यासंदर्भातील अर्ज केला आहे. दोन दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने, म्हणजेच शरद पवार गटानेही निवडणूक आयोगात अर्ज दाखल केला आहे. शरद पवारांनी केलेल्या अर्जानुसार निवडणूक आयोगाला पक्ष आणि चिन्हाबाबत एकतर्फी निर्णय देता येणार नाही, त्यांना निर्णय देण्याआधी शरद पवार गटाची बाजू ऐकून घ्यावी लागणार आहे.
अजित पवारांनी राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हावर दावा केला आहे, हे प्रकरण आता निवडणूक आयोगात गेलं आहे. त्यानुसार अजित पवारांकडे पक्षाचे किती आमदार आणि खासदार आहेत याची माहिती द्यावी लागणार आहे.
ही बातमी वाचा: