Sharad Pawar: घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, जे माझा फोटो लावतात त्यांना माहिती आहे, त्यांचं नाणं चालणार नाही; शरद पवारांची चौफेर टीका
Sharad Pawar On Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली असं शरद पवार म्हणाले.
![Sharad Pawar: घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, जे माझा फोटो लावतात त्यांना माहिती आहे, त्यांचं नाणं चालणार नाही; शरद पवारांची चौफेर टीका ncp sharad pawar on ajit pawar maharashtra political crisis marathi news update Sharad Pawar: घड्याळ चिन्ह जाणार नाही, जाऊ देणार नाही, जे माझा फोटो लावतात त्यांना माहिती आहे, त्यांचं नाणं चालणार नाही; शरद पवारांची चौफेर टीका](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/05/b707494d4aebfcedf7e1e650ffd3e51d168855332736493_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई: आज अनेकांनी वेगळी भूमिका घेतली, त्याबद्दल माझं काही मत नाही, पण पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांना विश्वासात न घेता वेगळी भूमिका घेतली गेली असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) म्हणाले. काही केलं तर पक्ष आणि चिन्ह जाणार नाही, ते जाऊ दिलं जाणार नाही असा ठाम विश्वास शरद पवारांनी दिला. जे लोक माझा फोटो वापरतात त्यांना माहिती आहे त्यांचं नाणं चालणार नाही असाही टोला त्यांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांना लगावला.
त्यांचं नाणं चालणार नाही
जे माझा फोटो लावतात, त्यांना माहिती आहे की त्यांचं नाणं चालणार नाही असा टोला शरद पवारांनी अजित पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर केला. मला पांडूरंग म्हणायचं आणि आमच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं असं सांगायचं असा कार्यक्रम काहींनी सुरू केल्याचं ते म्हणाले.
भोपाळच्या सभेमध्ये पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला भ्रष्टाचारी म्हटलं, पण दोन दिवसांपूर्वी झालेल्या शपथविधीत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना कशी शपथ दिली असा सवार राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर केली. विरोधकांना एकत्रित करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे पंतप्रधान अस्वस्थ झाल्याचंही ते म्हणाले.
शरद पवार यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या वाटचालीबद्दल बोलताना म्हणाले की, आज राष्ट्रवादीच्या स्थापनेला 24 वर्षे पूर्ण झाली, या काळात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राष्ट्रवादीची फळी तयार केली. यामध्ये अनेकजण आमदार, खासदार आणि मंत्री झाले. राष्ट्रवादीने अनेक नवीन नेते तयार केले. या नेत्यांना तयार करताना त्यांना महाराष्ट्राचा चेहरा बनवायचा होता, राज्यातल्या शेवटच्या माणसापर्यंत कसं पोहोचायचं हा विचार होता.
शरद पवार म्हणाले की, आज आपल्यासमोर संकटे आहेत, ज्यांचे विचार देशाच्या हिताचे नाहीत त्यांच्या हातात आज देशाची सूत्रे आहेत. केंद्रामध्ये मी अनेकांच्या मंत्रिमंडळात काम केलं. लोकशाहीमध्ये विरोधी असो वा सहकारी असोत, त्यांच्यात सुसंवाद असावा लागतो. जो काही निर्णय घेतला जातो त्यावर सर्वसमान्यांची प्रतिक्रिया काय आहे हे जाणून घ्यावं लागतं. आज देशामध्ये हा संवाद नाही.
देशातील विरोधक एकत्र येत असताना ज्यांच्या हातात सत्ता आहे ते अस्वस्थ होताना दिसत आहेत असं शरद पवार म्हणाले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी पंतप्रधानांनी सांगितलं की राष्ट्रवादीने 70 हजार कोटी रुपयांचा घोटाळा केला. एकदा पंतप्रधान बारामतीत आले होते, त्यावेळी ते म्हणाले की पवार साहेबांचे बोट धरून मी राजकारणात आलो. त्यानंतरच्या निवडणुकीत राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे आरोप केले.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)