ED Raids: जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा, 24 ठिकाणी ईडीचे छापे; लालू यादव यांच्या दोन मुलींच्या घरातून काय मिळाले?
ईडीने शुक्रवारी लालू प्रसाद यादव यांच्या मुली आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या विविध ठकाणी छापे टाकले आणि जमीन-नोकरीच्या घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात छापेमारी केली.
Land for Job Scam Case: अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांच्या मुली आणि जवळच्या सहकाऱ्यांच्या विविध ठिकाणी छापे मारले. नोकरीच्या बदल्यात जमिनीच्या घोटाळा प्रकरणात मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीच्या संदर्भात लालूप्रसाद यादव यांच्या घरासह देशातील 24 ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. ईडीने शनिवारी छापेमारीत काय सापडले याबाबत माहिती जाहीर केली आहे. या छाप्यात 1 कोटी रुपये रोख, 1900 अमेरिकनडॉलर्स, सुमारे 540 ग्रॅम सोने, 1.5 किलो सोन्याचे दागिने (सुमारे 1 कोटी 25 लाख रुपये किमतीचे) आणि काही आक्षेपार्ह कागदपत्रे सापडल्याचे ईडीने सांगितले आहे.
Land for Job Scam Case: ईडीने काय दिली माहिती?
ईडीच्या म्हणण्यानुसार, या प्रकरणाच्या तपासादरम्यान असे आढळून आले की सुमारे 600 कोटी रुपयांपैकी 350 कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी करण्यात आली आणि विविध बेनामीदारांच्या माध्यमातून 250 कोटी रुपयांचे व्यवहार झाले आहेत. यातील बहुतांश जमीन तत्कालीन रेल्वेमंत्री लालू यादव यांच्यामार्फत भारतीय रेल्वेत नोकऱ्या देण्याच्या नावाखाली पाटण्यातील पॉश भागात चुकीच्या पद्धतीने हडप केल्याचे तपासात समोर आले आहे. सध्याच्या बाजारभावानुसार त्यांची किंमत 200 कोटी रुपये आहे.
कोणाच्या नावावर बेनामी मालमत्ता, शेल कंपनी आणि याचा ज्यांना फायदा झाला त्यांची ओळख पटली असल्याची माहिती आहे. न्यू फ्रेंड्स कॉलनीतील बंगला मेसर्स एबी एक्सपोर्ट प्रायव्हेट लिमिटेडच्या नावावर आहे, तर प्रत्यक्षात तो बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात आहे. या मालमत्तेची किंमत केवळ 4 लाख रुपये कागदावर दाखवण्यात आली असली तरी त्याची खरी किंमत 150 कोटी रुपये आहे.
Land for Job Scam Case: ईडीने काय केला दावा?
ईडीने सांगितले की, तपासादरम्यान असे आढळून आले की जप्त केलेल्या जमिनीचे चार तुकडे असे आहेत की ते 'ग्रुप डी'च्या नोकऱ्या मिळवण्यासाठी 7.5 लाख रुपयांना विकत घेतले होते. ती नंतर आरजेडीचे माजी आमदार अबू दोजाना यांना साडेतीन कोटींना विकली गेली. हे पैसे बहुतांशी आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्या बँक खात्यात पाठवले गेले. अनेक रेल्वे झोनमध्ये नोकऱ्या मिळालेल्या लोकांपैकी 50 टक्क्यांहून अधिक लोक लालू यादव यांच्या कुटुंबातील विधानसभा मतदारसंघातील असल्याचा दावा ईडीने केला आहे.
काय आहे प्रकरण?
दरम्यान, आरोप केला आहे की 2004-2009 दरम्यान भारतीय रेल्वेच्या विविध झोनमध्ये 'ग्रुप डी' मध्ये विविध व्यक्तींची नियुक्ती करण्यात आली होती. नोकरीच्या बदल्यात अनेकांनी त्यांची जमीन तत्कालीन रेल्वे मंत्री लालू प्रसाद आणि ए के इन्फोसिस्टम प्रायव्हेट लिमिटेड यांच्या कुटुंबीयांना हस्तांतरित केली होती. लालूप्रसाद यांच्या पत्नी आणि बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी असे चार बेकायदेशीरपणे मिळवलेले भूखंड मेरिडियन कन्स्ट्रक्शन इंडिया लिमिटेड नावाच्या कंपनीला साडेसात लाख रुपयांना विकले, असा आरोप आहे. तर या भूखंडांची बाजारातील किंमत 3.5 कोटी रुपये होती.