(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Fuel Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठी वाढ, निवडणुकीनंतर इंधन दरवाढीचा भडका?
Crude Oil Price : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीने मागील सात वर्षातील उच्चांक गाठला आहे. तर, दुसरीकडे भारतात इंधनाचे दर स्थिर आहेत.
Fuel Price Hike : आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर भारतातील तेल कंपन्या इंधन दरवाढ करतात. सध्या, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत मागील सात वर्षाच्या तुलनेत विक्रमी वाढ झाली आहे. तर, दुसरीकडे तेल कंपन्यांनी अद्यापही इंधन दरात कोणतेही बदल केले नाहीत. जवळपास 80 दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या कच्च्या तेलाची किंमत 85 डॉलर प्रति बॅरल इतकी झाली आहे. ऑक्टोबर 2014 नंतर हा सर्वाधिक दर आहे.
भारतात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती नोव्हेंबर 2021 पासून स्थिर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत सुरू असलेल्या चढ-उतारानंतरही दर स्थिर होते. एप्रिल 2017 पासून तेल कंपन्यांकडून दररोज पेट्रोल-डिझेलच्या किंमती जाहीर केल्या जात आहेत. इंधन दर नियंत्रण मुक्त करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतल्यानंतर इंधन कंपन्यांना आणि ग्राहकांना फायदा होईल असे म्हटले होते. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती कमी झाल्याचा फायदा ग्राहकांना मिळाला नसल्याचे दिसून आले आहे. तत्कालीन युपीए सरकारने जून 2010 मध्ये पेट्रोल दर नियंत्रणमुक्त करत दराचा निर्णय कंपन्यांवर सोपवला होता. या निर्णयाला विरोधकांनी विरोध केला होता. युपीएनंतर सत्तेवर आलेल्या मोदी सरकारने ऑक्टोबर 2014 मध्ये डिझेलही नियंत्रणमुक्त केले. त्यानंतर डिझेल दराचा निर्णय कंपन्यांनी घेण्यास सुरुवात केली. सरकारी तेल कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत, विनिमय दर, कर, वाहतूक शुल्क आणि इतर अनेक गोष्टी लक्षात घेऊन किंमत निश्चित करतात.
एप्रिल 2020 मध्ये कच्च्या तेलाची किंमत 19 डॉलर प्रति बॅरल इतकी होती. त्या वेळेसही इंधर दर कपात झाली नव्हती. त्यावेळेस पेट्रोलचा दर 70 रुपयांच्या आसपास होता. तर डिझेलचा दर 64 रुपयांच्या आसपास होता. त्यानंतर कच्च्या तेलाचे दर वाढल्यानंतर टप्प्याटप्प्याने इंधन दरात मोठी वाढ झाली.
निवडणुकीनंतर इंधन दरवाढीचा भडका?
सध्या देशात पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इंधन दरवाढ होत नसल्याची चर्चा सुरू आहे. नोव्हेंबर 2021 मध्ये 14 राज्यांमधील 30 विधानसभा आणि 3 लोकसभेच्या जागांसाठी पोटनिवडणुका झाल्या होत्या. या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसला होता. त्यानंतर तीन नोव्हेंबर रोजी रात्री केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर काही राज्यांनी आपला कर कमी करण्याचा निर्णय घेतला. जवळपास 80 दिवस इंधन दर स्थिर आहेत. त्यामुळे निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर इंधन कंपन्या दरवाढ करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.
पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवण्यात सरकारची भूमिका नाही, असे अनेकदा सरकारकडून म्हटले जाते. मात्र निवडणुकीच्या काळात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ होत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.