नायलॉन मांजाने पतंग उडवाल तर तुमच्यावर येणार संक्रात; विक्रेत्यांसह पालक, मुलांवर थेट 'सदोष मनुष्यवधाच्या प्रयत्नाचा' गुन्हा
नायलॉन मांजाचा वापर, साठवणूक व विक्री करणाऱ्यांवर संक्रात येणार आहे. कारण नायलॉन मांजाने पतंग उडविणारे मुलं, पालक आणि विक्रेत्यांवर पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल होणारे.
नाशकात आत्तापर्यंत 50 गुन्हे, 7 पालकांसह 28 जणांना अटक
नाशिक पोलिसांकडून पहिल्यांदाच नायलॉन मांज्याचा वापरकर्ते आणि विक्रेत्यांवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल होणार आहे. नायलॉन मांजा वापरकर्त्यांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग असल्यानं त्यांच्या पालकांवर कारवाई केली जात आहे. नाशकात आत्तापर्यंत विक्रेत्यांसह 50 गुन्हे दाखल झाले असून 28 जणांना अटक करण्यात आली आहे. त्यात 7 पालकांनाही अटक करण्यात आली आहे. संक्रातीच्या पूर्व संध्येला नाशिक पोलिसांकडून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे पतंगोत्सव साजरा करताना नायलॉन मांजाचा वापर रोखण्यासाठी नाशिक पोलीस मैदानात सज्ज झाले आहे.
पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलिसांकडून ड्रोनद्वारे विशेष लक्ष
मकरसंक्रांतीला नागपुरात पतंगबाजी करणाऱ्यांवर नागपूर पोलिस ड्रोनद्वारे विशेष लक्ष ठेवणार आहे. पतंगबाजी करताना अनेक लोक नायलॉन मांजाचा वापर करतात आणि त्यामुळे वाहन चालक तसेच पक्षी जखमी होण्याच्या अनेक घटना घडतात. अशाच दुर्दैवी घटना टाळण्यासाठी पोलिसांनी यंदा पतंगबाजांवर करडी नजर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आणि त्या अंतर्गतच घरांच्या छतावरून तसेच खुल्या मैदानातून पतंगबाजी करणारे नायलॉन मांजाचा वापर तर करत नाही ना, हुल्लडबाजी तर करत नाही ना, यावर नजर ठेवण्यासाठी नागपूर पोलीस ड्रोनचा वापर करत आहे.
या कारवाईमध्ये जर कोणी ही पतंगबाज नायलॉन मांजा वापर करताना आढळले तर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई केली जाणार असून रीतसर गुन्हे दाखल केले जाणार आहे. अशी माहिती नागपूर पोलिसांच्या जोन 5 चे उपायुक्त निकेतन कदम यांनी दिली आहे.
नागपूर पोलिसांकडून सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक
शहरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची विक्री होऊ नये आणि त्याचा कोणी वापर करू नये यासाठी नागपूर पोलिसांनी सर्वच पोलीस ठाण्यात विशेष पथक ही तयार केले असून ते पतंगबाजांवर करडी नजर ठेवणार आहे. एवढेच नाही तर पोलीस उदघोषणा प्रणालीद्वारे शहरातील विविध भागात नायलॉन मांजा वापरू नये असे आवाहन करत आहे.
हे ही वाचा