(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिव्याखाली अंधार... कृषिमंत्री सत्तारांच्या जिल्ह्यात सहा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या
Chhatrapati Sambhaji Nagar News : कृषिमंत्री यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर, राज्यभरात कसे चित्र असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील (Marathwada) शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) काही थांबता थांबत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. धक्कादायक म्हणजे कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांच्या छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. कारण गेल्या सहा दिवसात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एकूण पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या करत जीवन संपवलं आहे. त्यामुळे कृषिमंत्री यांच्या जिल्ह्यात अशी परिस्थिती असेल तर, राज्यभरात कसे चित्र असेल याचा अंदाज लावला जाऊ शकतो.
पुन्हा दोन शेतकऱ्यांनी संपवलं जीवन!
या आठवड्यात आधीच जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली असताना, आता आणखी दोन शेतकऱ्यांनी आपले आयुष्य संपवले आहे. कर्जबाजारीपणास कंटाळून खुलताबाद तालुक्यातील दरेगाव आणि वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी येथील प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. शंकर अंबादास गायकवाड (वय 35 वर्षे) आणि राजूसिंग लालसिंग बेडवाळ (वय 40 वर्षे) अशी मयत शेतकऱ्यांची नावे आहेत.
दरेगाव येथील शेतकरी शंकर अंबादास गायकवाड यांना पाच एकर शेती असून, त्यांनी शेतीसाठी आणि इतर देणी देण्यासाठी कर्ज घेतले होते. शेतातून उत्पन्न निघत नसल्याने ते चिंतेत होते. याच विवंचनेतून 9 मार्च रोजी रात्री त्यांनी शेतवस्तीवरील घरासमोरील चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दुसऱ्या घटनेत बेंदवाडी येथील शेतकरी राजूसिंग लालसिंग बेडवाळ यांनी शेतीसाठी विविध ठिकाणाहून कर्ज घेतले होते. अशात कापूस आणि कांद्याला बाजारभाव मिळत नसल्याने हे कर्ज कसे फेडायचे याच चिंतेत ते होते. यातूनच 10 मार्च रोजी सकाळी पाच वाजता त्यांच्या घराजवळील शेडमध्ये त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
सहा दिवसात पाच शेतकऱ्यांच्या आत्महत्या!
खुलताबाद तालुक्यातील दरेगाव आणि वैजापूर तालुक्यातील बेंदवाडी येथील प्रत्येकी एका शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. तर कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या सिल्लोड मतदारसंघातील अंधारी गावात एकापाठोपाठ एक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. भागिनाथ बाळूबा पांडव (वय 46 वर्षे), जनार्दन सुपडू तायडे (वय 55 वर्षे) असे आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांची नावं आहेत. तर पाचव्या घटनेत गापूर तालुक्यातील वाहेगाव येथील शेतकऱ्याने देखील गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अशोक भिका शिरसाट असे या मयत शेतकऱ्याचं नाव आहे. वादळी वाऱ्यासह पावसाने गव्हाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. त्यामुळे झालेल्या नुकसानीचा धसका अशोक शिरसाट यांनी टोकाचे पाऊल उचलले.
इतर महत्वाच्या बातम्या: