Exclusive: औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटपाचा कथित व्हिडिओ व्हायरल, वातावरण तापलं
Gram Panchayat Election: या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वातावरण तापलं आहे.
Gram Panchayat Election: राज्यात सात हजार पेक्षा अधिक तर औरंगाबाद जिल्ह्यात आज 216 ग्रामपंचायतसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातील एका गावाच्या ग्रामपंचायत निवडणूकीत पैसे वाटप करतानाचा कथित व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमुळे परिसरात खळबळ उडाली असून, वातावरण तापलं आहे. मात्र या व्हिडिओची 'एबीपी माझा' कोणतेही पृष्टी करत नाही.
काय आहे व्हिडिओत...
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओमध्ये एका घराच्या बाहेर काही कार्यकर्ते उभे असल्याचं दिसत आहे. तर घरात आतमध्ये खुर्चीवर बसलेल्या एका व्यक्तीच्या हातात नोटा पाहायला मिळत आहे. तर समोर बसलेल्या व्यक्तीला हे पैसे देण्यात येत असल्याचे व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे. तर हे पैसे ग्रामपंचायत निवडणुकीत वाटले गेल्याचा दावा केला जात आहे. वैजापूर तालुक्यातील तिडी या गावातील हा व्हिडिओ असल्याचा देखील दावा केला जात आहे.
औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीत पैसे वाटपाचा कथित व्हिडिओ व्हायरल, वातावरण तापलं#GramPanchayatElection2022 #Aurangabad #VideoViral pic.twitter.com/sgQsVyVvIg
— ABP माझा (@abpmajhatv) December 18, 2022
वैजापूर मतदारसंघात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका
ठाकरे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा मतदारसंघ असलेल्या वैजापूर मतदारसंघात 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत आहेत. तर एक सरपंच व 45 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. ज्यात हिंगणे कन्नड ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध झाली. वैजापूर तालुक्यातील महालगाव ग्रामपंचायत आमदार बोरनारेंनी प्रतिष्ठेची केली आहे.
तहसीलदारांनी दिले चौकशीचे आदेश...
वैजापूरच्या तिडी गावातील पैसे वाटप करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने, याची दखल प्रशासनाने घेतली आहे. पैसा वाटप करणारा नेमका कोण आहे?,हा व्हिडिओ खरा आहे का? तसेच हा व्हिडिओ कधीचा आणि नेमका कुठला आहे याचा तपास करण्याचे आदेश वैजापूरचे तहसीलदार राहुल गायकवाड यांनी दिले आहे. तसेच या चौकशीतून नेमकं समोर काय येते, त्यानंतरच पुढील कारवाईची दिशा ठरवता येईल असेही तहसीलदार गायकवाड म्हणाले.
216 ग्रामपंचायतसाठी मतदान
औरंगाबाद जिल्ह्यातील 216 ग्रामपंचायतसाठी आज मतदान होत आहे. मात्र यातील काही ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने प्रत्यक्षात 208 ग्रामपंचायतसाठी आज मतदान होत आहे. एकूण 208 ग्रामपंचायतीसाठी 711 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडत आहे. तर याच पार्श्वभूमीवर पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
मोठी बातमी! औरंगाबादमध्ये ग्रामपंचायत मतदान केंद्राबाहेर हाणामारी, दोन जण जखमी