एक्स्प्लोर
व्हॉट अॅन आयडिया सरजी.! प्रशांत यांची मिश्रशेती, तिप्पट उत्पन्न!

चंद्रपूर: सगळी अंडी एकाच बास्केटमध्ये ठेवू नका या अर्थाची एक इंग्रजी म्हण आहे. एका ठिकाणाहून नुकसान झालंच तर दुसरीकडनं भरुन निघावं हा उद्देश. ही बाब लक्षात ठेवली प्रशांत मेश्राम या चंद्रपूरच्या युवा शेतकऱ्याने. त्यांनी एकच एक धान किंवा सोयाबीन पीक घेण्याऐवजी वेगवेगळी पिकं घेतली, त्याला कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालनाची जोडही दिली. या मिश्र शेतीचा त्यांना कसा फायदा झाला त्याबाबतचा हा आढावा -
प्रशांत मेश्राम .. शिक्षण M.A. पॉलिटिकल सायन्स.. शिक्षण झाल्यावर सरकारी नोकरीचे वेध लागणं साहजिक होतं. ३ वर्ष स्पर्धा परिक्षेची तयारीही केली.
घरी गावाकडे ८ एकर शेती होती. मात्र या शेतीत सोयाबीनसारखं पारंपरिक पीक घेतलं जायचं.
सोयाबीनच्या भावात चढ उतार ठरलेला, त्यामुळे एकरी ३० हजारापेक्षा जास्त उत्पादन त्यांना मिळत नव्हते. नोकरीचा नाद सोडून दिला आणि त्यांनी गाव जवळ केलं, शेतीत काही तरी नवीन प्रयोग करण्याचा निश्चय केला. एकाच पिकावर अवलंबून राहण्याची किंमत त्यांनी मोजली होती त्यामुळे प्रशांत मेश्राम यांनी मिश्र शेतीचा मार्ग पत्करला.
या मिश्र शेतीमध्ये ४ एकरात तूर आणि १ एकरात धान, चना, ज्वारीपिकासारखी पारंपरिक पिकं आहेतच, सोबत भाजीपाला पिकंही घेतली जातात, पण या सर्वांना कुक्कुटपालन, शेळीपालन आणि मत्स्यपालन अशीजोड दिली आहे.
कुक्कुटपालनासाठी प्रशांत यांनी गिरीराज आणि RIR या ५०० कोंबड्यांची बॅच घेतली आहे.
तर मत्स्यपालनासाठी प्रशांत यांनी शेतात २ शेततळी तयार केली आहे. १० आर मध्ये असलेल्या एका शेततळ्यात त्यांनी २ हजारांचं मस्त्य बीज टाकलं आहे.
या शेतीत रासायनिक खतं औषधांचा वापर करत नाहीत त्यामुळे खर्चात बचत होते आणि विषमुक्त अन्न मिळतं असं प्रशांत मेश्राम सांगतात.
चंद्रपूर जिल्ह्यात धान पीक मोठ्या प्रमाणावर घेतलं जातं मात्र या पिकातून एकरी १५ ते १६ हजारांचं अत्यंत अल्प उत्पन्न हाती पडतं, त्यामुळे प्रशांत मेश्राम यांचा मिश्रशेतीचा हा प्रयोग पाहायला परिसरातले इतर धान उत्पादक शेतकरीही येत आहेत.
मिश्रशेतीच्या या प्रयोगात त्यांनी उत्पादन खर्च कमी करण्यासाठी काटेकोर नियोजन केलय. तूर पिकातून मिळणारा कुटार त्यांच्या शेळीपालनासाठी कामी येतो. तर कुक्कुटपालन आणि शेळीपालनाच्या शेडमध्ये खाली पडलेलं खाद्य ते मत्स्यपालनासाठी वापरतात. असे प्रयोग फक्त तरुणांचाच नाही तर तर कृषी विभागाचाही उत्साह वाढवतात.
प्रयोगशीलता म्हणजे नक्की काय हे प्रशांत मेश्राम यांनी आपल्या कर्तृत्वातून दाखवून दिले आहे. त्यामुळेच नोकरीपेक्षा शेतीमधून शाश्वत प्रगती साधता येऊ शकते असं प्रशांत आत्मविश्वासाने सांगतात.
सारंग पांडे, एबीपी माझा, चंद्रपूर
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
भारत
राजकारण
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
