एक्स्प्लोर
Shakuntala Devi Movie Review | बरोबर उत्तराचं ताळा चुकलेलं गणित
दिग्दर्शिका अनु मेनन दिग्दर्शित हा सिनेमा अर्थातच शकुंतला देवी यांच्या जगण्याभवती फिरतो. अगदी बंगळुरूमध्ये त्या सहा-सात वर्षाच्या असल्यापासून सिनेमा सुरू होतो.
शकुंतला देवी
Comedy/Drama
Director
अनु मेनन
Starring
विद्या बालन,
मुंबई : अनु मेनन यांनी जेव्हा शकुंतला देवी या चित्रपटाची घोषणा केली तेव्हाच या सिनेमात काहीतरी अद्भूत असणार याची कुणकुण लागली होती. म्हणजे, विषय सिनेमाला साजेसा आहे यात शंका नाही. दैवी देणगी असल्यागत एक मुलगी पटापट गणितं सोडवते.. गुणाकार, भागाकार, वर्ग आदी करते.. आणि इतक्या जलदगतीने की संगणकही तिच्यापुढे ओशाळावा? शकुंतला देवी.. ह्युमन कॉम्प्युटर म्हणून त्यांचा नावलौकिक आहे. भारताची मान त्यांच्या कार्याने उंच झाली आहे यात शंकाच नाही. अशा विषयावर जेव्हा सिनेमा येतो तेव्हा तो पाहाणं आपलं आद्य कर्तव्य असतं. शिवाय त्यात जेव्हा विद्या बालनसारखी अभिनेत्री असते तेव्हा ही अपेक्षा कमाल वाढते.
दिग्दर्शिका अनु मेनन दिग्दर्शित हा सिनेमा अर्थातच शकुंतला देवी यांच्या जगण्याभवती फिरतो. अगदी बंगळुरूमध्ये त्या सहा-सात वर्षाच्या असल्यापासून सिनेमा सुरू होतो. त्याचं सिनेमातलं साल आहे 1934. अर्थात हा फॉरमॅट नॉनलिनिअर आहे. म्हणजे सिनेमा सुरू होतो 2001 पासून. मग तो फ्लॅशबॅकमध्ये जातो. तिथून पुन्हा आजमध्ये येतो... ते ठिकाय. शकुंतला देवींची गोष्ट सुरू होते 1934 पासून. निसर्गदत्त देणगी असल्यागत छोटी शकुंतला गणितं सोडवू लागते तिथूनच ही आकड्यांचा खेळ सुरु होतो. लहान वयातच तिला असलेली दैवी देणगी पाहून तिचे कार्यक्रम होऊ लागतात. सार्वजनिक कार्यक्रमात छोटी शकुंतला प्रेक्षकांतून, गणितज्ञांकडून आलेली अवघड अवघड गणितं पटापट सोडवू लागते. अर्थात हा एक भाग झाला. शकुंतला देवींच्या आयुष्यावर खोलवर परिणाम करुन गेलेले प्रसंग या सिनेमात आहेत. त्यांचं कुटुंबापासून तुटणं.. आपल्या आई-वडिलांबद्दल त्यांच्या मनात द्वेष असणं.. त्यानंतर त्यांचं स्वच्छंदी जगणं.. स्वातंत्र्योत्त्र काळात शकुंतला देवींचं इतकं बंडखोर असणं चकित करतं. त्यांच्या लग्नबद्दलच्या संकल्पना, त्यांना जग फिरण्याची असलेली आवड.. स्वावलंबी असणं आणि त्यातून आलेलं काठिण्य.. हे सगळं विद्या बालन या अभिनेत्रीने चोख वठवलं आहे. शकुंतला देवींचं आपल्या पतीसोबत.. मुलीसोबत.. आपल्या आईवडिलांसोबत असलेलं नातं लखलखीत दिसतं.
शकुंतला देवींना गणिताबद्दल असलेलं प्रेम.. आकड्यांचं असलेलं आकर्षण.. त्यातून त्यांनी आकड्यांची केलेली गंमत जंमत सिनेमातून कळते. तसं त्यात नाट्य फार नाही. कारण डोक्यात चाललेली कॅलक्युलेशन्स दाखवणं अवघड आहे. अर्थात या सगळ्या दरम्यान शकुंतला देवींच्या झालेल्या परीक्षा, त्यांच्यावर झालेलं संशोधन हे सगळं चकित करणारं आहे. शिवाय, हिमालयाएवढी उंची गाठलेल्या या महिलेचं महत्वाकांक्षी असणं तिच्या कुटुंबासाठी कसं घातक ठरलं तेही यात दिसतं. या सिनेमात त्यांची गणिताकडे पाहाण्याची दृष्टि यायला हवी होती असं वाटून जातं. म्हणजे, 10 आकडी संख्या पाहिल्यानंतर त्याचं गणित सोडवताना त्या काय विचार करत होत्या.. त्यांना गाणं कसं दिसत होतं.. गणिताची तालीम त्या करत होत्या का.. त्यांनी नवी थेएरी मांडली का.. गणित सोपं केलं का.. असं गणिताशी संबंधित काही मुद्दे आले असते तर ते विषयाला धरून अधिक खुलवता आलं असतं असं वाटून जातं.
पटकथा पूर्वार्धात नेटकी बांधली आहे. कारण, त्यात ड्रामा साधणारे प्रसंग पेरण्यात आले आहे. शकुंतला देवी एकदा ह्युमन कॉम्प्युटर म्हणून पडद्यावर एस्टॅब्लिश झाल्या की मात्र त्यानंतर हा सिनेमा कौटुंबिक व्हायला लागतो. अर्थात त्यातल्या त्यांच्या वर्तणुकीतून शकुंतला देवीची मतं कळतात, पण त्या पलिकडे गणिताबद्दलचा त्यांचा दृष्टिकोन धूसर होत जातो. आणि कौटुंबिक गोष्टी आल्या की हा सिनेमा सामान्य व्हायला लागतो.
या इतक्या मोठ्या व्यक्तिमत्वाचा कौटुंबिक पैलू काहीसा ग्रे असणं हे समजू शकतं. पण त्या पलिकडे, माणूस म्हणून त्याचं समाजाप्रती असलेलं योगदान दिसायला हवं होतं. निदान, मोठा आकडा पाहिला की त्यांना तो कसा दिसतो.. त्यांना आकडे काही सांगतात का.. गणिताबद्दल त्यांना काय वाटतं.. असं काही चिंतन आलं असतं तर ते डोळे दिपवणारं ठरलं असतं.
विद्या बालन यांनी अर्थातच कमाल केली आहे. कर्नाटकी उच्चार, देहबोली. नजर हे सगळं बखुबी वठवलं आहे. त्याला तितकीच उत्तम साथ अमित साध, सान्या मल्होत्रा यांनी दिली आहे. सिनेमाचं कलादिग्दर्शनही डोळ्यात भरणारं. श्रीमंती असं. सिनेमा बाकी चकचकीत असला तरी तो कौटुंबिक ड्रामा न करता, गणिती ड्रामा व्हायला हवा होता असं मात्र वाटून जातं.
पिक्चर बिक्चरमध्ये या सिनेमाला मिळताहेत अडीच स्टार्स. उत्तर बरोबर आलेल्या उत्तराचा हा चुकलेला ताळा वाटतो. शकुंतला देवींचं गणित आणि त्यावरचे सिद्धांत बाहेर आले असते तर हा ताळा चोख आला असता आणि त्यांचा मेंदू ह्युमन कॉम्प्युटर का आहे ते अधिक लख्खपणे समोर आलं असतं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
अहमदनगर
Advertisement