Leo Review : थलापती विजयचा 'लियो'कसा आहे? वाचा रिव्ह्यू
Leo Review : दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयचा (Thalapathy Vijay) 'लियो' हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.
लोकेश कनागराज
थलापति विजय, संजय दत्त, तृषा कृष्णन
Thalapathy Vijay Leo Review : थलापती विजय (Thalapathy Vijay) हा दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. थलापतीला स्क्रिनवर पाहिल्यानंतर चाहते थिएटरमध्ये जल्लोष करत असतात. आजही अभिनेत्याचा 'लियो' (Leo) हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर चाहत्यांनी सिनेमागृहात चांगलाच जल्लोष केला. 'लियो'च्या हिंदी शोला सकाळी 9.30 वाजताही प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. स्टारडम म्हणजे काय असतं ते हा सिनेमा पाहताना जाणवतं. स्टारडममुळे तो सिनेमा चालतो असं होत नाही. 'लियो' हा वन टाइम वॉच सिनेमा आहे. सिनेमाचे दोन्ही भाग उत्तम आहेत.
'लियो'चं कथानक काय आहे? (Leo Movie Story)
पार्थीबन नामक हिमाचलमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या आयुष्यावर आधारित 'लियो' हा सिनेमा आहे. पत्नी..दोन मुलं आणि एक कॅफे असं आरामदायी आयुष्य जगणाऱ्या पार्थीबनची गोष्ट या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या सिनेमाचा हीरो विजय आहे. त्यामुळे सिनेमात अभिनेत्याची दमदार एन्ट्री झाली आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच पार्थीबन एका खतरणार प्राण्यापासून गावकऱ्यांना वाचवतो. त्यानंतर सिनेमात खऱ्या अर्थाने ट्विस्ट येतो.
पार्थीबन हा एक साधासुधा माणूस नसल्याचं इथे स्पष्ट होतं. त्यानंतर सिनेमात संजय दत्तची (Sanjay Dutt) एन्ट्री होते. तो पार्थीबनला म्हणतो की मी 'लियो' आहे. संजयच्या पात्राचाही एक वेगळाच इतिहास आहे. आता 'लियो'नक्की कोण आहे? या सिनेमाचं कथानक नक्की काय आहे? हे जाणून घ्यायचं असेल आणि तुम्ही जर विजयचे चाहते असाल तर सिनेमागृहात जाऊन 'लियो' हा सिनेमा नक्की पाहा.
'लियो' हा सिनेमा कसा आहे?
'लियो' हा सिनेमा नेहमीप्रमाणेच दाक्षिणात्य सिनेमांसारखा मसालापट असलेला आहे. हीरो सर्वकाही करतो हे दाखवून देणारा. पण तरीही सिनेमाचा पहिला भाग हा विजय स्टाइल आहे. विजयचा स्वॅग आणि अॅक्शन पाहताना मजा येते. पण दुसरा भाग मात्र थोडा रटाळ झाला आहे. संजय दत्तची एन्ट्री धमाकेदार होते. पण त्याच्या येण्याने सिनेमा मात्र कंटाळवाणा होतो. सिनेमातील अॅक्शन सीन खूपच शानदार आहेत. पण हे अॅक्शन सीन पाहताना काहीही नवं पाहिल्यासारखं वाटत नाही. सिनेमाचा दुसरा भाग कंटाळवाणा झाल्याने सिनेमा रटाळ झाला आहे. फक्त आणि फक्त विजयसाठी तुम्ही हा सिनेमा पाहू शकता.
विजयचा अभिनय खूपच जबरदस्त आहे. त्याची स्टाइल, स्वॅग स्क्रीनवर धुरळा उडवतो. दोन्ही वर्जनमध्ये त्याने खूपच कमाल काम केलं आहे. सिनेमात त्रिशाने चांगलं काम केलं आहे. संजय दत्तने ठिकठाक काम केलं आहे. एकंदरीत सर्वच कलाकारांनी आपली भूमिका चोख बजावली आहे.
लोकेश कनगराजची (Lokesh Kanagaraj) स्वत:ची वेगळी स्टाईल आहे. पण तरीही 'लियो' सिनेमाकडून चाहत्यांच्या आणखी अपेक्षा होत्या. सुपरस्टारसोबत जेव्हा तुम्ही सिनेमे बनवता तेव्हा तुम्हाला ओपनिंग चांगलं मिळतं पण जर तुमचा कंटेंट चांगला असेल तरच सिनेमा बॉक्स ऑफिसवर जादू दाखवण्यात यशस्वी ठरतो. इथे 'लियो' सिनेमात सुपरस्टार आहे पण कंटेंट मात्र वन टाइम वॉच आहे. अनिरुद्ध रविचंदरने या सिनेमाला संगीत दिलं आहे. एकंदरीतच फक्त विजयच्या चाहत्यांनाच हा सिनेमा आवडेल.