Vishakha Subhedar : अभिनेत्री विशाखा सुभेदारचं मालिकाविश्वात कमबॅक; 'या' मालिकेत होणार एन्ट्री
Vishakha Subhedar : 'शुभविवाह' या मालिकेत विशाखा सुभेदार रागिणी आत्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
Vishakha Subhedar : अभिनेत्री विशाखा सुभेदारने (Vishakha Subhedar) छोट्या पडद्यावर जोरदार कमबॅक केलं आहे. 16 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या 'शुभविवाह' (Shubh Vivah) मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या मालिकेच्या माध्यमातून विशाखा मालिकाविश्वास कमबॅक करण्यासाठी सज्ज आहे.
'शुभविवाह' मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून या नव्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रेक्षक आतूर आहेत. या मालिकेत विशाखा सुभेदर रागिणी आत्या हे पात्र साकारणार आहे. 'शुभविवाह' मालिकेतील रागिणी आत्या या पात्राविषयी सांगताना विशाखा सुभेदार म्हणाली, ‘रागिणी प्रचंड महत्त्वाकांक्षी आहे. अनेक घटनांसाठी ती जबाबदार आहे याची तिला जाणीव आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्ट ती खूप काळजीपूर्वक करते. अतिशय शिस्तप्रिय, लाघवी, प्रेमळ आणि आकाशची काळजी घेणारी अशी ही आत्या आहे".
विशाखा सुभेदार पुढे म्हणाली,"मालिकेच्या निमित्ताने एखादं पात्र जगायला मिळणं आणि त्या पात्रानुसार बदलणाऱ्या भावभावना साकारणं एक कलाकार म्हणून आनंददायी आहे. या कथानकाला सुद्धा अनेक घाटवळणं आहेत. या घाटवळणांवरुन प्रवास करतानाची मजा मी रागिणी आत्याच्या रुपात अनुभवते आहे. ही मालिका करताना मी एकही पदरचं वाक्य घातलेलं नाही. इतक्या छान पद्धतीने आमचे पटकथाकार शिरीष लाटकर आणि संवाद लेखिका मिथीला सुभाष यांनी हे पात्र लिहिलं आहे. त्यामुळे प्रत्येक वाक्य बोलताना त्याचा मागचा पुढचा अर्थ काढावा लागतो".
View this post on Instagram
प्रत्येक सीनसाठी रागिणी हे पात्र कसं व्यक्त होईल याचा विचार करावा लागतो. आतापर्यंत प्रेक्षकांची मोलाची साथ मिळाली आहे. प्रेक्षकांचं हेच प्रेम 'शुभविवाह' मालिकेला मिळो अशी इच्छा विशाखा सुभेदार यांनी व्यक्त केली आहे. 'शुभविवाह' ही मालिका 16 जानेवारीपासून दुपारी 2 वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
संबंधित बातम्या