आम्हाला वाटतं उद्धव ठाकरेंनी सभागृहात असावं, त्यांनी महाराष्ट्राचं नेतृत्व केलंय, संजय राऊतांची 'मनसे' इच्छा; आता सतेज पाटील सावध पवित्रा घेत काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांनी राज्याचं उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील, असे ते म्हणाले.

Sanjay Raut: महाविकास आघाडीमध्ये विधानपरिषदेच्या जागेवरून रस्सीखेच होण्याची स्पष्ट चिन्हे आहेत. आमचे (शिवसेना ठाकरे) 20 आमदार आहेत, महाविकास आघाडीमध्ये सगळ्यात मोठा पक्ष आमचा आहे. पण 20 आमदार असताना सुद्धा आम्ही राज्यसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला दिली असल्याचे शिवसेना खासदार ,संजय राऊत यांनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर पाठवण्याबाबत त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. उद्धव ठाकरे यांनी राज्याचं उत्तम प्रकारे नेतृत्व केलं आहे, संकट काळात नेतृत्व केलं आहे. त्यांच्यासारख्या नेत्याने विधान परिषदेमध्ये असणं हे महाविकास आघाडीसाठी एक चांगले संकेत असतील आणि आमच्या आमदारांना बळ मिळेल, असे संजय राऊत म्हणाले.
सतेज पाटील सावध पवित्रा घेत म्हणाले..
संजय राऊत यांनी विधानपरिषदेला स्पष्टपणे भूमिका मांडल्यानंतर महाविकास आघाडीतून सावध पवित्रा घेतला आहे. विधानपरिषदेतील काँग्रेसचे गटनेते सतेज पाटील यांनी राजकीय वक्तव्ये करण्यापेक्षा आम्ही एकत्रित निर्णय घेऊ तो तुम्हाला दिसेल, असे त्यांनी नमूद केले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी महाविकास आघाडी एकत्र बसून निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया दिली.
लोकसभा अध्यक्षांवरील अविश्वास ठराव
दरम्यान, लोकसभा अध्यक्षांविरोधात आणलेल्या अविश्वास ठरावाचे समर्थन करताना राऊत म्हणाले, गेल्या 10 वर्षांपासून भारतीय घटनेचा, संसदीय लोकशाहीचा ज्या पद्धतीने गळा घोटला जातोच, त्याविरुद्धचा हा एक उद्रेक विरोधी पक्षांचा आहे. सरकारवर हुकूमशाहीचा आरोप करत ते म्हणाले की, संसदेत विरोधी पक्ष नेत्यांना बोलू दिले जात नाही आणि त्यांना सातत्याने अपमानित केले जाते. राहुल गांधी यांचे नाव घेत ते म्हणाले, राहुल गांधी यांना बोलू दिलं जात नाही, त्यांचे माईक बंद केले जातात. ते पुढे म्हणाले की, लोकसभा अध्यक्षांची भूमिका निष्पक्ष असली पाहिजे, पण दुर्दैवाने ते भारतीय जनता पार्टीच्या इशाऱ्यावर काम करत आहेत. सरकार आपल्या बहुमताच्या जोरावर विरोधकांचा आवाज संसदेत पोहोचू देत नाही, म्हणूनच शेवटी उपाय आणि हत्यार म्हणून लोकसभा अध्यक्षांच्या संदर्भातला अविश्वास ठराव विरोधी पक्षाने आणला आहे.
भारताचे परराष्ट्र धोरण आणि 'अमेरिकेची गुलामी'
अमेरिकेशी संबंधित मुद्द्यावर अत्यंत आक्रमक भूमिका मांडताना ते म्हणाले, भारताची पोझिशन जागतिक पातळीवरती आता काहीच नाही, प्रत्येक गोष्ट अमेरिकेला विचारून करावी लागते. 1947 पर्यंत देश ब्रिटिशांचा गुलाम होता आणि त्याविरुद्ध आम्ही 150 वर्षे संघर्ष केला. पण अलीकडच्या काळामध्ये हा देश अमेरिकेचा गुलाम होताना दिसतो ही अत्यंत चिंतेची गोष्ट आहे. पंतप्रधानांना बंगालमधील राष्ट्रपतींच्या अपमानावर भाषण करायला वेळ आहे, पण अमेरिकेसारख्या राष्ट्राकडून सातत्याने या देशाचा जो अपमान होतो आहे, त्याच्यावर ते बोलायला तयार नाहीत, असा हल्लाबोल राऊत यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या





















