Prabhakar Karekar Passed Away: नाट्यसंगीतातला दिग्गज हरपला! ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं प्रभाकर कारेकर यांचं निधन
बोलावा विठ्ठल... पाहावा विठ्ठल..., करिता विचार सापडले वर्म..., वक्रतुंड महाकाय... यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत.

Prabhakar Karekar Passed Away: दमसास, पल्लेदार ताना, धारदार आवाजात तडफदारपणे नाट्यपदे सादर करत रसिकांची वाहवा मिळवत अफाट लोकप्रीयता मिळवणारे प्रख्यात शास्त्रीय संगीतातील ज्येष्ठ गायक पंडित प्रभाकर कारेकर यांचं दीर्घ आजारानं काल (12 फेब्रुवारी) रात्री निधन झालं. ते 80 वर्षांचे होते. गेल्या तीन वर्षांपासून ते यकृताच्या आजारानं ग्रस्त होते. प्रभाकर कारेकर यांचं पार्थिव दादर येथील त्यांच्या घरी आज अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी 5 वाजता दादर स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील. (Prabhakar Karekar)
नभ मेघांनी आक्रमिले, बोलावा विठ्ठल.. पाहावा विठ्ठल, करिता विचार सापडले वर्म, वक्रतुंड महाकाय अशा गाजलेल्या गाण्यांसह नाट्यपदां ठुमऱ्या, नाट्यपदं सुरेल आणि गायनातील रंजकतेनं पं प्रभाकर कारेकर प्रसिद्ध होते.
बाणेदार अन् धारदार आवाज
पंडित प्रभाकर कारेकर यांचा जन्म 1944साली गोव्यात झाला होता. पण त्यांचं शास्त्रीय संगीताचं शिक्षण पंडित सुरेश हळदणकर, पंडित जितेंद्र अभिषेकी आणि पंडित सी आर व्यास यांच्याकडं मुंबईत झालं होतं. बाणेदार आणि धारदार आवाजाचे धनी म्हणून हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत आणि मराठी नाट्यसंगीतात त्यांची ओळख होती. बोलावा विठ्ठल... पाहावा विठ्ठल..., करिता विचार सापडले वर्म..., वक्रतुंड महाकाय... यांसारखी गाजलेली गाणी त्यांच्या नावावर आहेत. कारेकरांना तानसेन सन्मान (2014), संगीत नाटक अकादमी (2016), लता मंगेशकर पुरस्कार, गोमांतक विभूषण पुरस्कार (2021) आदी पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं.
कलासक्त व्यक्तीमत्व हरपलं
मास्टर दीनानाथांच्या ढंगातील नाट्यपदेही ते विशेष तडफदारपणे सादर करत. प्रत्यक्ष रंगभूमीवर भूमिका न करताही, नाट्यसंगीताच्या क्षेत्रात अफाट लोकप्रियता मिळालेले गायक म्हणून कारेकर प्रसिद्ध आहेत. पल्लेदार ताना आणि गायनातील रंजकता यांमुळे कारेकर आपल्या गायनाने रसिकांना तृप्त करतात. आकाशवाणीचे मान्यताप्राप्त कलाकार असून, दिल्लीहून प्रसारित होणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांत आणि आकाशवाणी संगीत संमेलनांत त्यांनी आपले गायन सादर केले. त्याचप्रमाणे त्यांना आकाशवाणीच्या विविध केंद्रांवरून गायन सादर करण्याची संधी मिळाली .अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, इटली, आखाती देश अशा अनेक देशांमध्ये त्यांनी आपले गायनाची भुरळ रसिकांना पाडली आहे. एक कलासक्त व्यक्तीमत्व हरपलं आहे. संगीत क्षेत्रात कारेकरांच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा
अभिनेत्री उर्मिला कोठारेची अपघातप्रकरणी न्यायालयात याचिका, तपास स्टेट सीआयडीकडे सोपवण्याची मागणी!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
