National Film Awards 2022 : राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया; म्हणतात...
National Film Awards 2022 : "हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच, पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करतोय, राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर राहुल देशपांडेंची प्रतिक्रिया.
National Film Awards 2022 : यंदाच्या 68व्या राष्ट्रीय पुरस्कारांची घोषणा झाली असून सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक म्हणून राहुल देशपांडे यांची निवड करण्यात आली आहे. निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित 'मी वसंतराव' (Me Vasantrao) या चित्रपटासाठी राहुल देशपांडे (Rahul Deshpande) यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आलं आहे. तसंच सर्वोत्कृष्ट ध्वनी आरेखन पुरस्कारदेखील अनमोल भावे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी मिळाला आहे.
राष्ट्रीय पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर राहुल देशपांडे म्हणतात, "हा पुरस्कार म्हणजे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ज्यावेळी माझे नाव या पुरस्कारासाठी जाहीर झाले त्यावेळी माझ्यासह माझ्या घरच्यांच्याही डोळ्यांत पाणी आले. हा पुरस्कार मी माझ्या आजोबांना म्हणजेच, पंडित वसंतराव देशपांडे यांना समर्पित करत आहे. कारण संगीताचा वारसा मला त्यांच्याकडून लाभला. त्यामुळे हा त्यांचाही सन्मान आहे. या पुरस्कारावर नाव माझे असले तरीही मेहनत चित्रपटाच्या संपूर्ण टीमची आहे. इतक्या वर्षांची मेहनत फळाला आली."
दिग्दर्शक निपुण धर्माधिकारी या यशाबद्दल म्हणतात, "हा क्षण खूप मौल्यवान आहे. 'मी वसंतराव'ची गाणी हा या चित्रपटाचा आत्मा आहे आणि या गाण्यांना राहुल देशपांडे यांनी पूर्णपणे न्याय दिला आहे. आणि आज त्याच्या या मेहनतीचा गौरव झाला आहे, याचा आम्हांला आनंद आहे."
जिओ स्टुडिओज प्रस्तुत 'मी वसंतराव' या चित्रपटाची निर्मिती चंद्रशेखर गोखले, दर्शन देसाई, आणि निरंजन किर्लोस्कर यांनी केली आहे.
'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांत' मराठीचा बोलबाला
'गोष्ट एका पैठणीची' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तर राहुल देशपांडे यांना पाश्वगायनाचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जाहीर झाला आहे. राहुल देशपांडे यांना 'मी वसंतराव' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट गायकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. गोदाकाठ आणि अवांछित या चित्रपटांसाठी किशोर कदम यांना विशेष ज्युरीचा पुरस्कार जाहीर झाला आहे.
दरम्यान, मनोरंजन सृष्टीत सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या कलाकारांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार दिला जातो. चांगले सिनेमे तयार व्हावेत आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळावे हा या पुरस्कारामागचा हेतू आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये प्रत्येक पुरस्कारासाठी वेगळा पुरस्कार दिला जातो. रौप्य कमळ, सुवर्ण कमळ अशी या पुरस्कारांची नावं आहेत. ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमींकडे सर्वाधिक राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आहेत.